Advertisement

जमिनीच्या वादातून भावाने भावालाच संपवलं

प्रजापत्र | Monday, 01/12/2025
बातमी शेअर करा

  बीड दि.१ (प्रतिनिधी): वडिलांच्या नावे असलेला प्लॉट मला दे, असे म्हणत मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या लहान भावाच्या डोक्यात काठी मारली. हा प्रकार शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास शहरातील इमामपूर रोडला घडला. सकाळी उठल्यावर जखमीला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मोठ्या भावाला विचारल्यावर आपण काही केलेच नाही, असा आव त्याने आणला. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत पेठबीड पोलिस ठाण्यात नोंद नव्हती, परंतु मोठ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

        सविस्तर माहिती अशी कि, सचिन शहाजी फरताडे (वय ३५) असे मयताचे नाव आहे. तर शशिकांत फरताडे (वय ४४) असे आरोपीचे नाव आहे. शहाजी फरताडे यांना चार मुले आहेत. ते आचारी असून बीड शहरातील इमामपूर रोडला वास्तव्यास आहेत. शशिकांत हा दुसरा, तर सचिन सर्वात लहान मुलगा होता. तो अविवाहित होता. शनिवारी रात्री १०  च्या सुमारास शशिकांत हा गांजा व दारूची नशा करून घरी आला. कोणालाही काही न बोलता त्याने आई दत्ताबाई यांचा गळा धरत हातावर काठी मारली. मोठा भाऊ अशोक सोडविण्यासाठी गेल्यावर त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. वडील शहाजी मदतीला धावले, तर त्यांच्याही मनगटावर काठीने मारहाण केली. एवढ्यात सचिन तेथे आला. शशिकांतने नशेत त्याच्यावरही हल्ला चढवला. एक काठी त्याच्या डोक्यात बसली. यात तो जखमी झाला होता. रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पेठबीड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदन करून तो नातेवाइकांच्या ताब्यात दिला. उशिरापर्यंत ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Advertisement

Advertisement