नांदेड : आनंदाने आजोळी आलेल्या अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप बालकावर भरधाव वेगातील 'हायवा'मुळे काळाने घाला घातला आहे. नवीन कौठा येथील चौकात झालेल्या भीषण अपघातात प्रणव संपत आचार्य (वय ३ वर्षे) या चिमुकल्याचा जागीच करूण अंत झाला, तर त्याचे आजोबा राजेश माधवराव भुतके (वय ४८) गंभीर जखमी झाले आहेत. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण नांदेड शहर हळहळले आहे.
बीड जिल्ह्यातील (Accident) अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील प्रणव आचार्य हा तीन दिवसांपूर्वीच आई शुभांगी आचार्य यांच्यासोबत नवीन कौठा येथील आजोबांच्या घरी आला होता. प्रणव आचार्य हा त्याचे आजोबा राजेश भुतके यांच्यासोबत सकाळी साडेसातच्या सुमारास जॉगिंगला गेला होता. जॉगिंग करून दोघे घराकडे परत येत असतानाच आय. जी. ऑफीससमोर वाय पॉइंटवर (पी.व्ही.आर.समोरील चौकात) हा अपघात झाला. मुरूम टाकून येणाऱ्या (हायवा आरजे-०४, जीडी-८७५१) या भरधाव वेगातील हायवा ट्रकच्या चालकाने (केसा राम थाना राम) निष्काळजीपणे वळण घेत पादचारी असलेल्या आजोबा-नातवाला जोरदार धडक दिली.अपघात इतका भीषण होता की, तीन वर्षीय प्रणवचा जागीच करूण अंत झाला. या अपघातात आजोबा राजेश भुतके यांच्या पायाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मयत प्रणवचे मामा नागेश राजेश भुतके यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी वाहनचालक केसाराम (रा. राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी आरोपी वाहनचालकास तातडीने ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे भरधाव वेगातील अवजड वाहने आणि निष्पाप पादचारी नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

