बीड दि. २२ (प्रतिनिधी): प्रभाग क्रमांक ११ ‘ब’ मधील उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर भाजपने तातडीने निर्णय घेत माणिक बाबुराव वाघमारे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. हा निर्णय डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सक्षम उमेदवार पुढे करण्याच्या भूमिकेतून घेण्यात आला आहे.
बीड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ११ ‘ब’ मधून माणिक वाघमारे यांना भाजपचे पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करून नगरसेवक पदाच्या सर्वच जागांवर सक्षम उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान, प्रभाग ११ ‘ब’ मधील भाजपचे उमेदवार इर्शाद शेख यांच्या अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. तांत्रिक कारणांमुळे त्यांचा अर्ज अवैध ठरल्यानंतर पक्षाला पर्यायी उमेदवार जाहीर करावा लागला. त्यानुसार जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी माणिक बाबुराव वाघमारे यांची अधिकृत पत्राद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंद केली. माणिक वाघमारे यांनी आपण संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली लढत आहोत, असे सांगितले. प्रभागातील सर्व मतदारांनी आपले सहकार्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
