Advertisement

 देवदर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीला भीषण अपघात

प्रजापत्र | Saturday, 22/11/2025
बातमी शेअर करा

 धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी): सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर आंदुरजवळ क्रुझर गाडीचे टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. तसंच सदर अपघातात सात ते आठ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यात आले आहे.

    अपघातातील सर्व प्रवासी दक्षिण उळे, सोलापूर येथील होते आणि ते सोलापूरहून नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी जात होते. क्रुझरचे टायर फुटल्याने गाडी पलटी झाली आणि पलटी झालेल्या क्रुझरची ट्रॅक्टरला धडक बसली. हा अपघात सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर आंदुर गावाजवळ झाला. क्रुझर गाडीचे अचानक टायर फुटले. त्यामुळे गाडी चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली. पलटी झाल्यानंतर ही क्रुझर एका उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जाऊन धडकली. या धडकेत गाडीचा चक्काचूर झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना गाडीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांकडून अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

देवदर्शनासाठी जाताना वाटेतच काळाचा घाला

अपघातातील सर्व प्रवासी हे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण उळे गावचे रहिवासी होते. ते सर्वजण मिळून सोलापूरहून नळदुर्ग येथे एका धार्मिक स्थळी दर्शनासाठी निघाले होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. टायर फुटणे हे अपघाताचे प्राथमिक कारण सांगितलं जात आहे.

Advertisement

Advertisement