माजलगाव दि. १९ (प्रतिनिधी ) : माजलगाव नगरपालिका निवडणुकीत यावेळी राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके यांच्यासमोर भात आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दुहेरी आव्हान आहे. त्यातही कायम जनतेतले चेहरे म्हणून ओळख असलेल्या बाबुराव पोटभरे ,सहाल चाऊस आणि मोहन जगताप या त्रिमूर्तीच्या प्रभावाला कसा काटशह द्यायचा हे ठरवताना किंवा त्यांचा सामना करताना आ. प्रकाश सोळंके यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
माजलगाव नगरपालिकेची निवडणूक यावेळी बहुरंगी दिसत आहे. त्यातही भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात काट्याची टक्कर होईल असे अपेक्षित आहे. विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर अनेक ठिकाणी आ. प्रकाश सोळंके यांनी 'मला माजी करण्यासाठी अनेक जण झटत होते , पण कोणालाही ते जमले नाही ' असे सांगत त्यांच्या विरोधकांना डिवचण्याचेच काम केले. त्यामुळे आता माजलगाव मनगरपालिकेत त्यांची कोंडी करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मोठा व्यूह आखला आहे.मोहन जगतापांनी सहाल चाऊस यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली आहे. शहरात स्वतः मोहन जगताप यांचे वर्चस्व चांगले आहे, तर सहाल चाऊस यांचा स्वतःचा प्रभाव आणि त्यांची शहराची जाण याला तोडनसल्याची राजकीय परिस्थिती आहे. त्यातही माजलगावच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव ठेवून असलेल्या बाबुराव पोटभरे यांनी यावेळी तुतारीला साथ देण्याची भूमिका घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. बाबुराव पोटभरे यांचा प्रभाव केवळ आंबडेकर चळवळीच्या मतदारांवरच नव्हे तर शहरातील इतरही समूहांवर आहे. त्यांच्या निवासस्थानी कायम शहरातील विविध समस्यांची सोडवणूक सुरु असते. त्यामुळे बाबुराव पोटभरे यांनी जगताप आणि चाऊस यांच्या जोडीला जाणे म्हणजे आ. सोळंके यांची डोकेदुखी अधिकच वाढविणारे आहे. मधल्या काळात , म्हणजे विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर ' मला अनेकांनी विरोध केला ते बरेच झाले, आता किमान त्यांच्यामुळे मी निवडणून येत होतो असे तर कोणी म्हणणार नाही ' असे देखील आ. सोळंके खाजगीत म्हणायचे असे सांगितले जाते. हा सारा प्रकार त्यांना विधानसभेत विरोध करणाऱ्या बाबुराव पोटभरे आणि इतरांना डिवचणारा ठरलेला आहे. त्यातच भाजपसोबत युती करण्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र त्याला भाजपने प्रतिसादच दिला नाही. त्यामुळे एकीकडे भाजपचे आव्हान आणि दुसरीकडे जगताप , पोटभरे , चाऊस या त्रिमूर्तींचा प्रभाव यामुळे आ. सोळंके यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे.
आक्षेप नाट्यामुळे 'तुतारी'ला सहानुभूती
माजलगाव शहराच्या राजकारणात सहाल चाऊस यांचे एक वेगळे स्थान आहे. तुल्यबळ उमेदवारांनी कायम निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांची शक्ती दाखवून द्यायची असते, तांत्रिक गोष्टीत खेळायचे नसते असे अपेक्षिले जात असते. मात्र चाऊस यांच्या कुटुंबातील उमेदवाराच्या उमेदवारीवर घेतलेला आक्षेप, त्यात आ. सोळंके यांनी वापरलेले दबावतंत्र आणि त्यातूनच सहाल चाऊस यांच्यासारख्या नेत्याला आलेले अश्रू या साऱ्या गोष्टीची सहानुभूती 'तुतारी 'ला मिळेल अशा चर्चा सध्या सुरु आहेत.

