बीड दि.१९ (प्रतिनिधी)-पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि तक्रारदारांना न्याय मिळवा यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले असताना दुसरीकडे ग्रामीण पोलिसांच्या अजब भूमिकेमुळे मात्र खाकीची प्रतिमेवर प्रश्न उपस्थितीत होऊ लागले आहेत.पालीजवळील धनवडे वस्तीवर दोन चोरटयांनी एका खडी क्रेशरवाल्याला लुटल्यानंतर आधी आरोपी शोधतो आणि नंतर गुन्हा दाखल करू अशी भूमिकाच पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी घेतल्याने ग्रामीण पोलिसांच्या अफलातून पोलिसिंग सध्या चर्चचा विषय ठरत आहे. फिर्यादीला न्याय देण्याऐवजी दाद न देणाऱ्या पोलीस निरीक्षकांची कारकीर्द पेठ बीड पोलीस ठाण्यातही वादग्रस्त राहिली होती.
महेश रामराव धनवडे (वय-३०,रा.धनवडे वस्ती) यांना ९ नोव्हेंबर रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास खडी क्रशरवरून वापस येताना दोघांनी शस्त्राचा धाक दाखवून खिशातील ३५ हजार,दोन तोळे चैन आणि कानातील बाळी काढून घेतली.यानंतर धनवडे यांनी रात्री तात्काळ १०० नंबरवर फोन करून घटनेची माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार द्या असे सांगितले.रविवारी सकाळी धनवडे पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना थांबा पंचनामा करू आणि मग गुन्हे दाखल करू असा निरोप देण्यात आला.मात्र त्यादिवशी काहीच झाले नाही.सोमवारी पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी धनवडे यांना आपण आताच या ठाण्यात आलो आहेत,थोडा वेळ द्या म्हणून सांगितले.मात्र दोन दिवसानंतरही पोलिसांनी बघ्याचीच भूमिका घेतली.यानंतर याप्रकरणात पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांनी गुन्हा दाखल करा असे सांगितले पण ग्रामीण पोलिसांनी वरिष्ठांच्या भूमिकेनंतर तर नवल वाटावी अशी भूमिका जाहीर करताना आधी आम्ही आरोपी तपासतो आणि नंतर गुन्हा दाखल करतो असे सांगितल्याने पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थितीत होत आहेत.
चोरटयांनी मारहाण करायला हवी होती ?
महेश धनवडे यांनी ग्रामीण पोलिसांना आपली आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांनी फिर्याद घेण्याऐवजी उलट त्यांच्यावरच प्रश्न उपस्थितीत केले.चोरटयांनी तुम्हाला लुटले आहे तर मग मारहाण का केली नाही?अंगावर एकही वळ नसताना आणि तुमचे रक्त निघाले नसताना तुम्हाला चोरटयांनीच लुटले असे कशावरून समजायचे? खाकीकडून आश्चर्य वाटावे असे प्रश्न उपस्थिती केला जाऊ लागल्याने चोरटयांनी फिर्यादीला मारहाण करायला पाहिजे होती असे पोलिसांना अपेक्षित आहे का असा प्रश्न उपस्थितीत होतं आहे. नागरिकांनी पोलिसांच्या अश्या भूमिकेमुळे दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न यनिमित्ताने निर्माण होतोय.
माहिती घेऊन कळवतो-एसपी
पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी स्वतः याप्रकरणात लक्ष घालून आपण काय झाले हे पाहतो आणि पोलीस निरीक्षकांना याबाबत विचारतो अशी प्रतिक्रिया दिली आहे.

बातमी शेअर करा
