नवी दिल्ली : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता आज, बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केला जाणार आहे. देशातील सुमारे ९ कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट दोन हजार रुपयांचा निधी जमा होईल. मात्र, योजनेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एका विशेष कार्यक्रमातून डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात हा २१ वा हप्ता हस्तांतरित करतील.
'या' शेतकऱ्यांचा हप्ता अडकणार
सरकारने योजना अधिक पारदर्शक ठेवण्यासाठी आणि अपात्र लोकांना वगळण्यासाठी काही महत्त्वाचे नियम बंधनकारक केले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप खालील तीन प्रमुख कामे पूर्ण केलेली नाहीत, त्यांचा २१ वा हप्ता अडकण्याची शक्यता आहे:
भू-सत्यापन अपूर्ण: अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमिनीची पडताळणी (लँड सीडिंग) पूर्ण केलेली नाही. अशा अपूर्ण पडताळणी असलेल्या खात्यांमध्ये पैसे जमा होणार नाहीत.
ई-केवायसी न करणे: सरकारने अनिवार्य केलेल्या ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागेल.
आधार लिंकिंग अपूर्ण: पीएम किसान योजनेसाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते अद्याप आधार-सीडिंग झालेले नाही, त्यांचा हप्ता खात्यात जमा होणार नाही.

