मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यभर राबवली आहे. या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. यासाठी सर्व लाभार्थ्यांनी १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत e-KYC पूर्ण करणे बंधनकारक होते.
मात्र राज्यातील पूर, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे हजारो महिलांना ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही. या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वाचा दिलासा देत e-KYC ची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे.ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे, अशा लाभार्थ्यांनी स्वतःचे e-KYC करावे लागणार आहे. मात्र ओटीपी कसा येणार असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर आता पर्याय देण्यात आला आहे. पती/वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे अधिकृत प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेशाची सत्यप्रत संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी लागणार आहे. या निर्णयामुळे योजनेचा लाभ खंडित होणार नाही, असे महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केले आहे.
ओटीपी येत नाही?
सध्या लाखो महिला एकाच वेळी e-KYC करत असल्याने https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रचंड ताण येत आहे. परिणामी OTP येण्यास उशीर होतो किंवा साइट क्रॅश होते. यावर उपाय म्हणून लाभार्थ्यांना खालील वेळेत e-KYC करण्याचा सल्ला दिला आहे रात्री १२ नंतर ते पहाटे ५ वाजेपर्यंत या वेळेत सर्व्हरवर लोड कमी असल्याने प्रक्रिया जलद होते. तसेच सरकारने दोन महिन्यांचा पुरेसा अवधी दिला आहे.

