Advertisement

 मेंढीला वाचवायला गेलेली बहीण बुडताना पाहून भावाची पाण्यात उडी

प्रजापत्र | Sunday, 16/11/2025
बातमी शेअर करा

अहिल्यानगर:   कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील चांदेकसारे येथे शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जुन्या खाणीतील पाण्यात बुडून डाऊच खुर्द येथील सख्ख्या भाऊ–बहिणीचा करुण अंत झाल्याची घटना घडली. सार्थक गणपत बडे आणि सुरेखा गणपत बडे (दोघेही, रा. डाऊच खुर्द) अशी मृतांची नावे असून या घटनेमुळे संपूर्ण डाऊच खुर्द परिसरासह कोपरगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. (Ahilyanagar News)

    याबाबत अधिक माहिती अशी की,  डाऊच खुर्द येथील गणपत बडे यांचा मेंढीपालनाचा व्यवसाय आहे. शनिवारी त्यांची मुले सार्थक आणि सुरेखा हे दोघे चांदेकसारे परिसरातील जुन्या खाणीजवळ मेंढ्या चारत होते. मेंढ्या पाणी पिण्यासाठी खाणीच्या कडेला गेल्या असता, त्यापैकी एक मेंढी पाण्यात घसरून पडली. मेंढीला वाचवण्यासाठी सुरेखा पुढे झाली; परंतु पाय घसरल्याने ती स्वतःच खोल पाण्यात बुडू लागली. बहिणीला बुडताना पाहताच भाऊ सार्थक याने क्षणाचाही विलंब न करता तिला वाचवण्यासाठी खाणीत उडी घेतली. मात्र पाण्याची खोली, खाणीत जमा झालेली दलदल आणि भीती यामुळे दोघेही बाहेर येऊ न शकल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

खाणीजवळ कपडे धुण्यासाठी थांबलेल्या काही महिलांनी हा प्रकार पाहताच आरडाओरड करून नागरिकांना सतर्क केले. पोलीस पाटील मीराताई रोकडे, डॉ. गोरक्षनाथ रोकडे आणि उपसरपंच वसिम शेख यांनी ही माहिती त्वरित कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना दिली. संजय गुरसळ यांनी तरुणांसह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह खाणीतून बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिकेतून दोन्ही मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर डाऊच खुर्द येथे शोकाकुल वातावरणात दोघांचा अंत्यविधी पार पडला. या घटनेमुळे गणपत बडे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Advertisement

Advertisement