पुणे : समाजप्रबोधनकार म्हणून ओळख असलेले निवृत्ती महराज इंदुरीकर यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यात लाखोंचा डामडौल केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. कमी खर्चात लग्न करा, असा विचार कीर्तनांमधून मांडणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी लेकीसाठी मात्र अमाप पैसा खर्च केल्याने ते टीकेचे धनी ठरले.मात्र आता इंदुरीकर महाराज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. मुलीच्या कपड्यांवरुन केलेल्या टीकेमुळे आपण त्रस्त झाल्याने दोन-दिवसांमध्ये कीर्तन थांबवण्याचा विचार करीत आहोत, असं इंदुरीकर महाराज म्हणाले. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामुळे ते खरंच कीर्तन थांबवतात का, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
व्हिडीओमध्ये इंदुरीकर महाराज म्हणतात, आमची पोरं लहान असताना ८-८ दिवस माझी त्यांच्याशी भेट होत नव्हती.. आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत, यावरुन लोकांचे कमेंट्स येतात. आता ४ दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या.. तुम्ही मला घोडे लावा पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे? मुलीचं लग्न ठरल्यावर तिला कपडे कोण घेतं हे ही क्लिप टाकणाऱ्याला कळू नये का?
इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले की, मुलगी तुम्हालाही आहे आणि मलाही आहे, पण या ८ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलंय. दोन दिवसात मी एक क्लिप टाकणार.. बास झालं ३१ वर्षे.. लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्य चाललं सगळं. आयुष्यात चांगलं करूनही त्याचं हे फळ.. माझ्यापर्यंत ठीक होतं पण घरादारापर्यंत जायला नको होतं. मी आजही समर्थ आहे उत्तर द्यायला, पण कुटुंबापर्यंत आल्यावर मज्जा नाही.कीर्तनसेवा थांबवण्याचे संकेत देताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, लोकं कमेंट्स करतात की, ' इंदुरीकरने आता कीर्तन बंद करायला पाहिजे, त्याला लाज वाटली पाहजे ' आम्ही येत्या २-३ दिवसात यावर विचार करतोय आणि निर्णय घेतोय! असं म्हणत त्यांनी लवकरच मोठा निर्णय घेत असल्याचं सांगितलंय.

