बीड-केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आता नागरिकांना महागाईचा झटका बसणार आहे. इंधनाचे दर काही दिवस शांत राहिल्यानंतर आता बुधवारी रात्री (दि.३) तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी प्रति लिटर ३५ पैशांची वाढ केली. याच प्रकारे एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.बीडमध्ये पेट्रोल ९४.३४ तर डिझेलने ८३.५२ रुपयांच्या घरात प्रवेश केला आहे.नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी इन्फ्रा सेस लावण्यात आला आहे. मात्र, सर्वसामान्या ग्राहकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही, असे सरकारने म्हटले होते.
इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना १४ किलोच्या नॉन सब्सिडी घरगुती गॅस सिलिंडरसाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. एलपीजी सिलिंडरचे दर २५ रुपयांनी वाढले आहेत. यामुळे आता बीडमध्ये सिलिंडरचा दर ७४५ रुपये,दिल्लीत सिलिंडरचा दर ७१९ रुपये, कोलकात्यात ७४५ रुपये, मुंबईत ७१० तर चेन्नईमध्ये ७३५ रुपयांवर पोहोचला आहे.बीडमध्ये काल ७२० रुपयांनी सिलिंडरची विक्री सुरु होती.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. असे असले तरी, भारतीय बॉस्केटसाठी जे कच्चे तेल येते, त्यावर आंतरराष्ट्रीय किंमतीचा प्रभाव २० ते २५ दिवसांनंतर दिसून येतो.
महागाई वाढण्याचीही शक्यता
नव्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे आता महागाई वाढण्याचीही शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, डिझेल दरवाढीचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होत असतो. यामुळे माल वाहतुकीचा खर्च वाढतो आणि माल वाहतुकीचा खर्च वाढला, की प्रत्येक वस्तू महाग होण्याची शक्यताही वाढते.