मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत आज एक मोठा निर्णय घेतला. ओबीसी आरक्षण व त्या संदर्भातील 'कुणबी' प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राज्यात सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत किंवा विधानसभेच्या, पक्षाकडून 'मूळ' ओबीसी(OBC) उमेदवारांनाच संधी दिली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांनाच संधी द्या, अशी स्पष्ट सूचना शरद पवारांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पदाधिकारी, आमदार, खासदारांना दिली. मात्र ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही, केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपसोबत युतीला पुन्हा एकदा स्पष्ट नकार
शरद पवारांनी पुन्हा एकदा भाजप (BJP) सोबत कोणत्याही परिस्थितीत युती करू नये, याचा पुनरुच्चार केला. पक्षाने महाविकास आघाडीसोबत (MVA) राहून आगामी निवडणुका लढवाव्या, यावरही त्यांनी भर दिल्याचे समजते.

