बीड दि. ८ (प्रतिनिधी ): राजकारणात अनेकदा अनेक गोष्टी दाखविण्यासाठीच्या वेगळ्या असतात आणि प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच असते . अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या तेच चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत पक्षाध्यक्षांसमोर झालेल्या बैठकीत या पक्षातील बीडमधली दुफळी समोर आल्यानंतर आता आज मुलाखत मंडळ म्हणून अनेक चेहरे एकत्र येणार आहेत, मात्र मुलाखतीसाठी एकत्र येणारांची प्रत्यक्ष दिलजमाई होणार का हा प्रश्न तसाच आहे.
बीड नगरपालिकेच्या बाबतीत मागच्या ९ वर्षात अनेक घटना घडत गेल्या. मागच्या निवडणुकीत बीड नगरपालिकेरवरील डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या एकछत्री वर्चस्वाला आ. संदीप क्षीरसागर यांनी त्यावेळच्या काकू नाना आघाडीच्या माध्यमातून सुरुंग लावलाच होता. सभागृहात नगराध्यक्ष असलेल्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना अल्पमतात जावे लागले होते हे वास्तव आहे. अर्थात त्यावेळी आ. संदीप क्षीरसागर यांच्यासोबत असलेले अनेक चेहरे मागच्या काळात त्यांच्यापासून दुरावले. अमर नाईकवाडे , फारूक पटेल ही ठळक नावे झाली, याची यादी आणखीही मोठी होईल. मात्र आ. संदीप क्षीरसागर यांच्यापासून दुरावलेल्या या चेहऱ्यांना देखील नंतर एकच ठिकाणी असे राहता आले नाही. जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वात शिवसेना , मग अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि तेथेही डॉ. योगेश क्षीरसागर यांना विरोध असा सारा प्रकार या बंडखोर चेहऱ्याच्या बाबतीत पाहायला मिळाला.
आता आ. संदीप क्षीरसागर यांना शहरात रोखायचे ठरवून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे डॉ. योगेश क्षीरसागर उतरलेले असले तरी त्यांच्या पक्षातील दुफळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अडचणी वाढविणारी आहे. एकीकडे डॉ. योगेश क्षीरसागर विधानसभा अध्यक्ष असले आणि बीड नगरपालिकेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वात व्हावी असे त्यांना अपेक्षित असले तरी पक्षाने त्यांच्या समर्थकांना उमेदवारी अर्ज घ्यायला मात्र शहराध्यक्षांकडे पाठविले , यावरूनच पक्षातील रस्सीखेच लक्षात येऊ शकते. अजूनही राष्ट्रवादीत नेतृत्व कोणी करायचे ? 'व्यवस्थापन ' आणि 'नियोजन' कोणी करायचे ? डॉ. योगेश क्षीरसागरांवर टीकास्त्र सोडणाऱ्या बंडखोर गटाचे नेमके काय ? पक्षातील वरिष्ठ एकाचवेळी अनेकांना गोंजारत असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत पक्ष म्हणून सारे एकमेकांना खरोखर मदत करणार का ? या प्रश्नांची उत्तरे कार्यकर्त्यांना देखील मिळायला तयार नाहीत. अशा वातावरणात आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक असणारांच्या मुलाखती होणार आहेत. अद्याप नगराध्यक्षपदाचा चेहरा कोण असेल हे निश्चित नाही. आज मुलाखतीसाठी आतापर्यंत एकमेकांवर टीका करणारे एकत्र बसलेले पाहायला मिळतील, मात्र ही एकी मुलाखतीपूर्तीच राहणार का खरोखर यांची दिलजमाई होणार यावर निवडणुकांची अनेक गणिते अवलंबून असतील.
असे असेल मुलाखत मंडळ
राजेश्वर चव्हाण, संजय दौंड ,डॉ. योगेश क्षीरसागर ,अमर नाईकवाडे ,बळीराम गवते, फारूक पटेल, अशोक हिंगे

