फलटण: डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यु प्रकरणात स्वायत्त आणि निष्पक्ष तपास व्हावा, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे आज फलटण शहरात मोठा मोर्चा काढण्यात आला. सकाळी साडेअकरा वाजता मालोजी चौकातून सुरू झालेला हा मोर्चा दुपारी एकच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यावर धडकला. डॉक्टर संपदाला न्याय मिळालाच पाहिजे, मुख्यमंत्री-गृहमंत्री हाय हाय आणि एसआयटी नेमा – आरोपींना अटक करा अशा घोषणांनी शहरात वातावरण पेटले होते. मोर्चात महिलांसह हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला.
मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले, तर ऑल इंडिया पँथर सेनेचे संस्थापक दीपक केदारही उपस्थित होते. विशेष म्हणजे, डॉ. संपदा मुंडे यांचे वडील श्रीकिसन मुंडे आणि चुलतभाऊ डॉ. प्रमोद मुंडे हे स्वतः मोर्चात सहभागी झाले होते. संपदाच्या मृत्यूला केवळ आत्महत्या म्हटले जात असले तरी, त्यामागे राजकीय दबाव आणि पोलिसीय हात असल्याचा संशय असल्याने याप्रकरणाची संपूर्ण एसआयटीमार्फत चौकशी करण्याची ठाम मागणी करण्यात आली.मोर्चादरम्यान सुषमा अंधारे यांनी सरकारवर तीव्र टीका करताना म्हटले की, जेव्हा एसआयटी नेमायचीच होती तर आधीच रणजीत नाईक निंबाळकरांना क्लीनचीट देण्याची घाई कशासाठी केली? हा तपास आधीच एका विशिष्ट दिशेने वळवण्याचा प्रयत्न आहे का? त्यांनी पुढे विचारले की, एसआयटीच्या तपासात निंबाळकर, पोलिस अधिकारी, डॉक्टरांसह संबंधित सर्वांना तपासाच्या कक्षेत आणले जाणार का? की एसआयटी फक्त नावापुरती राहणार आहे?मोर्चात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. रूपाली चाकणकर राजीनामा द्या असा जोरदार घोषवाक्यांनी वातावरण दणाणले. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते की, संपदा मुंडे या स्वतः महिला डॉक्टर असताना, महिला आयोगाने त्यांच्यासाठी न्यायाची मागणी करणे गरजेचे होते, परंतु ते न करताच गप्प बसले.
डॉ. संपदा मुंडे यांचे कुटुंबीय भावनिक होत आम्हाला केवळ निष्पक्ष तपास हवा, राजकीय दबाव नको, अशी मागणी करत होते. शहर पोलिस ठाण्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात असून, पोलिसांनी मोर्चाचा व्हिडिओ रेकॉर्डिंगसह सतत देखरेख ठेवली. मोर्चा संपल्यानंतर नेत्यांनी पोलिस अधिकार्यांना निवेदन दिले व सरकारकडे पुढील कारवाईची मागणी केली.या मोर्च्यानंतर शिवसेनेने इशारा दिला आहे की, जर संपूर्ण एसआयटी नेमली गेली नाही, तर पुढचे आंदोलन राज्यव्यापी असेल. संपदा मुंडे प्रकरणात आता राजकीय तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.
 
                                    
                                
                                
                              
