Advertisement

 महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक

प्रजापत्र | Saturday, 01/11/2025
बातमी शेअर करा

पंजाबमधील मोहाली पोलिसांनी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखसह (Sikandar Shaikh) चार जणांना अटक करून आंतरराज्य शस्त्र पुरवठा साखळीचा (interstate arms supply network) पर्दाफाश केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीसह क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. वडिलांनी हमाली करून वाढवलेल्या पैलवान सिकंदर शेखच्या शस्त्र तस्करीच्या कारनाम्याने आजपर्यंत कमावलेली प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे. अटकेतील आरोपी कुप्रसिद्ध पापला गुज्जर टोळीशी निगडीत आहेत. अवैध शस्त्रे पंजाबमधील गुन्हेगारी टोळ्यांना पुरवण्यासाठी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथून मिळवण्यात आली होती. सिकंदर कथितरित्या स्थानिक नेटवर्कसाठी शस्त्रे खरेदी करण्याच्या उद्देशाने मोहालीला गेला होता. त्याला यूपीच्या दानवीर आणि बंटीसोबत एअरपोर्ट चौकाजवळील गोपाल स्वीट्स इथं व्यवहारादरम्यान अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण पाच पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली.

पोलिसांना संशय आहे की या नेटवर्कचे पंजाबमार्गे पैसा पाठवणाऱ्या आंतरराज्य टोळ्यांशी (multiple state-based gangs) संबंध होते. सिकंदर शेख (वय 26) हा राष्ट्रीय स्तरावरील पैलवान असून तो मुळचा सोलापूरमधील आहे. अन्य आरोपींमध्ये दानवीर हा उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी आहे. तो पापला गुज्जर टोळीचा मुख्य सूत्रधार (key operative) आहे. दानवीरवर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये खून (murder), दरोडा (dacoity) आणि आर्म्स ॲक्टचे अनेक गुन्हे दाखल आहेत. बंटी (वय 26) हा देखील उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी आहे. कृष्ण कुमार उर्फ ​​हॅपी गुज्जर (वय 22) हा एसएएस नगरमधील नड्डा गावचा आहे. सिकंदरच्या अटकेमुळे गुन्हेगारीशी संबंध असलेले खेळाडू आंतरराज्य शस्त्रास्त्रांच्या व्यवहारांसाठी चेहरा म्हणून वापरले जात असल्याचे समोर आलं आहे. या टोळीची साखळी शोधण्यासाठी उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे छापे टाकले जात आहेत आणि पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक (SSP) हरमनदीप सिंग हंस यांनी दिली आहे.

महाराष्ट्र केसरी ते शस्त्रांची तस्करी! 
दरम्यान, सिकंदर शेख शस्त्र तस्करीमध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिकंदर मूळचा सोलापूरचा असला तरी त्याने कोल्हापुरात कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं आहे. कोल्हापुरातील गंगावेश तालमीमध्ये त्यानं कुस्तीचे धडे गिरवले. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्यामुळे त्याचं नाव महाराष्ट्रातील घरोघरी पोहोचलं. त्यानंतर त्याला क्रीडा कोट्यातून भारतीय लष्करामध्ये भरती झाला. मात्र, नोकरी सोडून दिली होती. सिकंदर हा पदवीधर असून गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये शस्त्र पुरवठा साखळीत तो मध्यस्थ म्हणून काम करत होता. त्यामुळे अत्यंत गरीब घराण्यातून पुढे आलेल्या सिकंदरच्या कारनाम्यामुळे आजपर्यंत कमावलेली प्रतिष्ठा डागाळली आहे.

Advertisement

Advertisement