Advertisement

पुतण्याच्या मारहाणीत चुलत्याचा मृत्यु 

प्रजापत्र | Monday, 13/10/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.१३ (प्रतिनिधी) : आष्टी तालुक्यातील (Ashti)लोणी सय्यदमीर येथे शेतीच्या वादातून तीन पुतण्यांसह तीन सुना,अशा सहा जणांनी कोयता,लोखंडी पाइपने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या छबू देवकर वय (७२) या चुलत्याचा अहिल्यानगर येथील रुग्णालयात रविवारी मृत्यु झाला. ही घटना शनिवार (दि.११)रोजी संध्याकाळी ०६:३० च्या सुमारास घडली.  

   आष्टी तालुक्यातील (Crime) लोणी सय्यदमीर येथील देवकर कुटुंबामध्ये अनेक दिवसांपासून शेतातील बांध व पाइपलाइनच्या कारणावरून धुसफूस सुरू हाेती. शनिवार (दि.११)रोजी संध्याकाळी ०६:३० वाजता लहान मुले चेंडू खेळत असताना झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन तीन पुतणे व सुना अशा सहा जणांनी मिळून कोयता, लाेखंडी पाइपने केलेल्या मारहाणीत छबू देवकर, वय ७२ हे गंभीर जखमी झाले. वादामध्ये पडलेला छबू देवकर यांचा मुलगा मिठू देवकर हाही जखमी झाला आहे. दरम्यान, हाणामारीत गंभीर जखमी झालेले छबू देवकर यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आल्यांनतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

सहा जणांना गावातून घेतले ताब्यात
अंभोरा ठाण्याचे सपोनि मंगेश साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. दोन पथके तयार करत आरोपीच्या शोधासाठी पाठवली. लोणी सय्यदमीर गावातून रविवारी पहाटे पुतणे रामदास देवकर, राहुल देवकर, संतोष देवकर यांच्यासह सून कविता देवकर, मनीषा देवकर, लता देवकर यांना ताब्यात घेतले आहे. मयत छबू देवकर यांच्यावर लोणी सय्यदमीर गावात पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले असून, या गुन्ह्याचा तपास सपोनि मंगेश साळवे करत आहेत.

 

Advertisement

Advertisement