मुंबई : निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये ९६ लाख खोटे मतदार घुसवले आहेत असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. काही वेळापूर्वी मनसेच्या मेळाव्यात त्यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला की “मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त होत नाहीत तोवर महाराष्ट्रात निवडणुका घेऊ नका.गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आम्ही आणखी एक वर्ष थांबू. परंतु, तुम्ही आधी मतदारयाद्यांमधील घोळ दुरुस्त करा.”
दरम्यान, राज ठाकरे यांनी यावेळी घोषणा केली की निवडणूक आयोगाविरोधात आणि सरकारविरोधात आपला लढा कसा असेल याची माहिती आज दुपारी सर्वपक्षीय पत्रकार परिषदेतून दिली जाईल. त्यानुसार शिवसेना (उबाठा) भवन येथे सर्व विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून विरोधी पक्षांनी घोषणा केली की येत्या १ नोव्हेंबर शनिवार रोजी राज्यातील सर्व विरोधी पक्ष विराट मोर्चा काढतील.