केज दि.६(प्रतिनिधी): तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील बजगुडे वस्तीवर रविवार (दि.५)रोजी सायंकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घराशेजारी उकिरड्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात साचलेल्या पाण्यात बुडून आर्या अमोल बजगुडे (वय ७) या पहिलीत शिकणाऱ्या चिमुकलीचा मृत्यु झाला.
आर्याचे आई-वडील, अमोल बजगुडे आणि त्यांची पत्नी, हे दोघेही रविवारी शाळेला सुट्टी असल्याने पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या आर्याला घरी ठेवून घराशेजारील शेतात कामासाठी गेले होते. सायंकाळी ५ च्या सुमारास आर्या खेळता खेळता घराजवळील उकिरड्यासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ गेली. या खड्यात पावसाचे पाणी साचले होते. अचानक, आर्याचा तोल गेला आणि ती साचलेल्या पाण्यात पडली. बराच वेळ होऊनही आर्या न दिसल्याने आईने घरी धाव घेतली. तेव्हा आर्या खड्यातील पाण्यात पडल्याचे त्यांच्या लक्षात आले.आर्याच्या आईने तात्काळ तिला पाण्यातून बाहेर काढले. नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक होती. आई-वडिलांनी तिला केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच नाका-तोंडात पाणी जाऊन आर्याचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. चिमुकलीच्या अशा अचानक जाण्याने बजगुडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बातमी शेअर करा