छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टीने अक्षरश: हाहाकार माजवला. मराठवाड्यातील ७५ मंडळांत अतिवृष्टी झाली असून पावसाने ५ जणांचे जीव घेतले आहेत. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाने कहर केला.
पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टर व बोटींच्या साह्याने स्थलांतरित केले जात आहे. पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा असणार आहे. तसेच, शुक्रवारनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.
दिवाळीपूर्वी भरपाई
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने सुरू आहेत. दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात दिली, तर मराठवाड्यातील अतिवृष्टीचा सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्वतंत्र आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून परिस्थिती जाणून घेतली.
कुठे कुठे काय घडले?
बीड : २९ महसूल मंडळात अतिवृष्टी;शिरूर,पाटोद्यात घरांत शिरले पाणी,७० कुटूंबियांची स्थलांतर,२० ते २५ गावांचा संपर्क तुटला
हिंगोली : पांगरा (शिंदे) येथे ओढ्याला पूर आल्यामुळे ८० जण अडकले. त्यांना दोरीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.
जालना : दहा मंडळांत अतिवृष्टी, पुरात अडकलेल्या १४ जणांना वाचविले.
धाराशिव : परंडा तालुक्यात २० पेक्षा अधिक गावांत पुराचे पाणी, चिंचोली (ता. भूम) येथे ७० वर्षीय महिलेचा मृत्यु .
यवतमाळ : उत्तरवाढोणा (ता. नेर) वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू.
जळगाव : भोकरी (ता. पाचोरा) येथे पुरात वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू.
जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यातही धो धो
जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. रुग्णालये, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. सोलापूर जिल्ह्यात एकाच रात्री १९ मंडळांत अतिवृष्टी झाली. चांदणी, भोगावती, नीलकंठा, नागझरी, राम, सीना नदीला पूर आला आहे. विदर्भात पावसाची विश्रांती असली तरी गेल्या काही दिवसांतील पावसामुळे पिकांची नासाडी झाली आहे.