Advertisement

जुन्या भांडणाची कुरापत काढत युवकावर हल्ला

प्रजापत्र | Saturday, 13/09/2025
बातमी शेअर करा

 अंबाजोगाई दि.१३(प्रतिनिधी): वराह विक्रीच्या कारणावरून जुन्या भांडणाचा वाद काढून अंबाजोगाईत एकावर लोखंडी रॉड, काठ्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       गोविंदसिंग मच्छीन्द्रसिंग गोके (वय २६) व्यवसाय मजुरी व वराहपालन, रा. केज, जि. बीड हे २३ ऑगस्ट रोजी सायं. ६.३० वा. ते घरासमोर असताना धनु भिमराव जाधव रा.सदर बाजार, अंबाजोगाई याने फोनवरून एक वराह घेऊन येण्यास सांगितले. फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ गोविंद वराह घेऊन मोटरसायकलवर अंबाजोगाईकडे निघाले. होळ जवळ असताना पुन्हा फोन करून “लोखंडी सावरगाव जवळील कळंब चौकातील सह्याद्री हॉटेलजवळ थांब असे धनुने सांगितले.

सायं. ७.१५ वा. फिर्यादी व त्यांचा भाऊ हॉटेलसमोर थांबले. रात्री ८.३० वा. धनु जाधव सोबत विजयसिंग शेरसिंग गोके, विरसिंग शेरसिंग गोके, तेजासिंग शेरसिंग गोके, आझादसिंग शेरसिंग गोके, जयसिंग शेरसिंग गोके व बालाजी धोत्रे (सर्व रा. अंबाजोगाई) असे सर्वजण शस्त्रसज्ज होऊन आले. जुन्या वादावरून आरोपींनी शिवीगाळ करून लोखंडी रॉड, काठ्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीचा जबडा फॅक्चर झाला. हल्ल्यानंतर फिर्यादीचा ३० हजारांचा मोबाईलही हरवला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमींना नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात विजयसिंग, विरसिंग, तेजासिंग, आझादसिंग, जयसिंग शेरसिंग गोके, बालाजी धोत्रे व धनु भिमराव जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement