अंबाजोगाई दि.२८(प्रतिनिधी): तालुक्यातील चतुरवाडी येथे तीन वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी बंडु जांभळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
बंडू जांभळे हे ग्रामपंचायत जोगाईवाडी येथे नेमणुकीस असून चतुरवाडीचे कामकाजही तेच पाहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, चतुरवाडी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह दि.२८ मार्च २०२२ रोजी आमोल मोतीराम मदने (रा.फरदपूर, ता. रेणापूर, जि. लातूर) याच्यासोबत लावण्यात आला. विवाहावेळी मुलगी अल्पवयीन असूनही बालविवाह झाल्याचे तपासात स्पष्ट झाले.तक्रारीनंतर ग्रामपंचायत कर्मचारी अन्सर हमीद पठाण, आशा कार्यकर्ती छाया खांडेकर, अंगणवाडी मदतनीस सुमन पवार व लिपिक अविनाश वाकडे यांनी चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीतूनही हा विवाह झाल्याची खात्री पटली. यावेळी पिडीत मुलीचे आई-वडील, मुलाचे वडील मोतीराम मदने, आई संजीवनी मदने हे सर्व विवाहास उपस्थित होते. हा विवाह संजय बाबुराव गोडबोले (रा. जोगाईवाडी) यांच्या हस्ते लावण्यात आला होता.अल्पवयीन मुलगी असल्याचे माहिती असतानाही विवाह लावून देण्यात आल्याने पती आमोल मदने, मुलीचे आई-वडील, मुलाचे आई-वडील मोतीराम व संजीवनी मदने तसेच विवाह लावणारे संजय गोडबोले अशा सहा जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.