मुंबई : मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात हाहाकार माजला होता.अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती,तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.अशा पार्श्वभूमीवर आता भारतीय हवामान विभागाने (IMD Maharashtra Warning) पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिला आहे.आजपासून शुक्रवार (दि.२९) ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची (Rainfall) शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभर पुन्हा एकदा पावसाचा जोरदार खेळ पाहायला मिळणार आहे.
मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसह उत्तर कोकण भागात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाडा-विदर्भात पावसाचा अंदाज
यासोबतच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी लागणार असल्याचे सांगितले आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरही अनुभवता येईल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.