Advertisement

मरगळलेल्या जिल्हा परिषदेला गती देण्यासाठी सीईओंचे प्रयत्न     

प्रजापत्र | Friday, 22/08/2025
बातमी शेअर करा

 बीड दि. २१ (प्रतिनिधी ) : दोन महिन्यापूर्वी बीड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेले जितीन रहेमान यांनी मागच्या दोन महिन्यात बीड जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाचा आढावा घेऊन मरगळ आलेल्या जिल्हा परिषदेला एक गती देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. दोन महिन्यात शिक्षण, आरोग्य , पाणी पुरवठा , ग्रामीण विकास यंत्रणा, नरेगा  आदी महत्वाच्या विभागाचा आढावा घेऊन या सर्व विभागांशी संबंधित कार्यक्रमांना गती देण्यासाठी एक कालबद्ध आराखडा तयार करत या विभागाचा चेहरा अधिकाधिक विकासाभिमुख करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
बीड जिल्हा परिषदेत दोन महिन्यापूर्वी जितीन रहेमान हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले होते. रुजू होतानाच 'मी येथे कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय काम करणार असून  जिल्ह्याला जिल्हापरिषदेच्या माध्यमातून विकासाच्या वाटेवर नेणार ' असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांनी कोणताही गाजावाजा न करता काम सुरु केले असून जिल्हापरिषदेतील महत्वाच्या विभागांना गती देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. शिक्षण विभागात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अधिकाधिक फायदा शिष्यवृत्ती आणि इतर योजनांमधून करून दिला जाणार आहे.
 

ऊसतोड कामगारांच्या नोंदणीवर भर
जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य साठी योजना सुरु करण्यात आली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आता अगोदर ऊसतोड कामगारांच्या नोंदणीवर भर देण्यात येणार आहे. ग्रामसेवकांना या नोंदणीची जबाबदारी देण्यात आली असून जास्तीत जास्त नोंदणी कशी होईल हे पाहिले जाणार आहे.

 

नरेगा अपूर्ण कामे होणार पूर्ण
नरेगाच्या सर्व कामांचा आढावा घेण्यात आला असून प्रत्येक काम ट्रॅक केले जाणार आहे. अपूर्ण कामे पूर्ण झाली नाहीत तर एपीओंवर कारवाई होणार आहे, त्याच सोबत मस्टर संपल्याच्या आठ दिवसात मजुरांना मजुरी मिळावी यासाठी नियोजन करण्यात आले आहे
 

घरकुल बांधकामात राज्यात दुसरे स्थान
केंद्र आणि राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या घरकुल योजनेत बीड जिल्हा दोन महिन्यात रेड झोन मधून यलो झोनमध्ये आला आहे. २० हजार घरकुलांची कामे झाली असून दिवाळीपर्यंत ५० हजार घरकुल पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Advertisement

Advertisement