Advertisement

राज्यात पावसामुळे १२ ते १४ लाख हेक्टर शेतपिकांचं नुकसान

प्रजापत्र | Tuesday, 19/08/2025
बातमी शेअर करा

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नांदेडमध्ये ढगफुटीसदृश परिस्थिती असून आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, काही ठिकाणी जनावरंही दगावली आहेत. राज्यात १२ ते १४ लाख हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले असून, याबाबत पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्र्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील पावसाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. १२ ते १४ लाख हेक्टर शेतपिके बाधित झाली असून, जनावरांचेही नुकसान झाले आहे. नांदेडमध्ये ढगफुटीसदृश परिस्थिती आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सतर्क आहे.

 

मुंबईत परिस्थिती पूर्वपदावर
"मुंबईत ३०० मिमी पावसाची नोंद झाली असून, हा मोठा पाऊस मानला जातो. यामुळे काही सखल भागात पाणी साचले आहे. पाणी उपसण्याचे काम सुरू असून, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लोकल ट्रेनचे वेळापत्रकातही कोलमडले आहे, परंतु आता परिस्थिती सुधारत आहे, असंही ते म्हणाले. तसेच मिठी नदी धोक्याच्या पातळीवर गेली होती, परंतु आता पाण्याची पातळी कमी होत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

सरकार अलर्टमोडवर
हवामान विभागाने पुढील काही तास पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सरकार सतर्क असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत. शाळा आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

 

शेतपिकांचं पंचनामे करण्याचे निर्देश
दरम्यान, शेतपिकांच्या नुकसानीबाबत विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले, "जिथे मृत्यू, जनावरांचे नुकसान किंवा घरांचे नुकसान झाले आहे, तिथे जिल्हाधिकाऱ्यांना नियमानुसार आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. यशिवाय जिथं शेतपिकांचं नुकसान झालं आहे, तिथे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, एनडीआरएफच्या नियमानुसार लवकरच मदत दिली जाणार आहे."

Advertisement

Advertisement