सुरत: गुजरातमधील वलसाड येथे पार पडलेल्या (Raksha Bandhan) रक्षाबंधामुळे सर्वांचे डोळे पाणावले होते. कारण हा रक्षाबंधन पुर्णपणे वेगळा होता. त्याच कारण म्हणजे एका बहिणीचे निधन झालं, पण तिच्या हातांनी तिच्या मोठ्या भावाला राखी बांधली गेली. राखी बांधणाऱ्या भावासाठी हा क्षण सर्वात भावनिक होता. त्यालाही अश्रू अनावर झाले.
नेमकं काय घडलं?
गुजरातची रहिवासी असलेल्या ९ वर्षांच्या रिया मिस्त्रीचे सप्टेंबर २०२४ मध्ये निधन झाले. पण तिचा छोटा उजवा हात अजूनही जिवंत आहे. रियाचा उजवा हात मुंबईतील दुसऱ्या एका मुलीला प्रत्यारोपित करण्यात आला. याच मुलीने मृत रियाचा मोठा भाऊ शिवमला
या वर्षी रक्षाबंधनाला राखी बांधली.
मुंबईची अनमता अहमद ही जगातील सर्वात लहान मुलगी आहे, जिच्या खांद्यापर्यंत हात प्रत्यारोपण करण्यात आलेले आहे. अनमता १६ वर्षांची आहे. डॉक्टरांनी रियाचा हात अनमताला बसवला आहे. रिया ही जगातील सर्वात तरुण अवयवदाती होती. जेव्हा रियाला अनामताचा हात मिळाला, तेव्हा हा क्षण दोन्ही कुटुंबांमधील एक पूल बनला. दोन्ही कुटुंबे प्रेम, दुःख आणि कृतज्ञतेच्या बंधनात बांधली गेली होती.
आई मुलीच्या आठवणीत झाली भावनिक
जेव्हा शिवमच्या हातावर अनमताने राखी बांधली तेव्हा त्यांचे नाते अतूट झाले. रियाची आई तृष्णा यावेळी भानविक झाली, त्यावेळी त्या म्हणाल्या, जेव्हा अनमताने शिवमला राखी बांधली तेव्हा आम्हाला असे वाटले की रिया राखी बांधण्यासाठी आली आहे. मी तिचे आवडीचे गुलाब जामुन बनवले आहेत. आम्ही दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधन साजरे केले. आमच्या मुलीच्या जाण्याच्या दुःखातून आम्हाला अजूनही सावरता आलेले नाही, पण आज अनमताला पाहून आम्हाला आनंद होतो. ती किती आनंदी आहे आणि ती किती चांगले जीवन जगत आहे हे पाहून आम्हाला दिलासा मिळाला आहे.जेव्हा अनमता इथे पोहोचली तेव्हा रियाच्या कुटुंबाने तिचा उजवा हात धरला. तिची आई तिचा हात धरून रडत राहिली. तिच्या भावानेही तिच्या बहिणीच्या हातांना स्पर्श केला. तिच्या वडिलांनीही तिचा हात धरला आणि हाताला स्पर्श केला. सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. यावेळी सर्वजण भावनिक झाले.
अनमता मुंबईहून गुजरातला राखी बांधण्यासाठी आली होती
तृष्णाने सांगितले की, रियाला कोणत्याही सणाचे व्हिडिओ बनवण्याची आणि भरपूर फोटो काढण्याची खूप आवड होती. फक्त शिवमच नाही तर रियाचे चुलत भाऊ आणि मित्रही अनमताच्या हातून राखी बांधण्यासाठी येत आहेत. अनमता मुंबईहून तिचे आई,वडील अकील आणि दाराशा यांच्यासोबत रियाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आली होती. अनमता म्हणाली की, मी रियाच्या कुटुंबाला भेटण्याची वाट पाहत होते. ते आता माझे कुटुंब आहेत. तिने सांगितले की कुटुंबात ती एकुलती एक मुलगी आहे. तिला भाऊ नव्हता पण आता तिला एक भाऊ देखील आहे.
गेल्या वर्षी रियाला ब्रेनडेड
रियाला 15 सप्टेंबर रोजी सुरतमधील किरण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे तिला ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान झाले. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले. डॉ. उषाने रियाच्या आई-वडिलांना बॉबी आणि तृष्णा यांना अवयवदानाबद्दल सांगितले. बॉबी आणि तृष्णा यांनी अवयवदानाला होकार दिला. रियाचे मूत्रपिंड, यकृत, एक हात, फुफ्फुसे आणि कॉर्निया काढून इतर रुग्णांना हस्तांतरित करण्यात आले.मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉ. नीलेश सातभाया यांनी रियाचा हात अनामताला प्रत्यारोपित केला. डोनेट लाइफचे संस्थापक नीलेश मंडलेवाला म्हणाले की, हा एक चमत्कार आहे. जगातील सर्वात लहान मुलीचा हात सर्वात लहान मुलीवर यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात आला आहे.
अनामताच्या हाताला काय झालेलं?
ऑक्टोबर 2022 मध्ये, अनामता एका अपघाताचा बळी ठरली होती. ती उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे एका नातेवाईकाच्या घरी होती. ती टेरेसवर खेळत असताना तिला विजेचा धक्का बसला. ती चुकून 11000 किलोवॅट क्षमतेच्या विद्युत हाय-टेन्शन केबलच्या जवळ गेली. तिच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. ती खूप भाजली होती. तिला गॅंग्रीन झाला. अखेर तिचा उजवा हात खांद्यापासून कापावा लागला. शस्त्रक्रियेमुळे तिचा डावा हात वाचला.