दिल्ली : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी शनिवारी (दि. २ ऑगस्ट) मोदी सरकारने खुशखबर दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून एका क्लिकद्वारे (Pm kisan)पीएम किसान सन्मान निधीचा २० हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला. यावेळी शेतकऱ्यांना २ हजार रुपयांच्या हप्त्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागली.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते आज वाराणसीमध्ये सुमारे २,२०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले.पीएम मोदी यांनी आज वाराणसी येथील कार्यक्रमातून योजनेचा २० वा हप्ता जारी केला. २०१९ मध्ये पीएम-किसान योजना सुरू झाल्यापासून, १९ हप्त्यांमध्ये ३.६९ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. २० व्या हप्त्यात, ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २० हजार ५०० कोटी रुपये डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्यात आले.पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेली मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत, दरवर्षी ६ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) पद्धतीने शेतकऱ्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाते.