Advertisement

उपमुख्यमंत्री म्हणे साधणार संवाद , पण नकारात्मक काही बोलायचं नाही ! प्रशासनाचा 'विवेकी ' सल्ला ?

प्रजापत्र | Saturday, 02/08/2025
बातमी शेअर करा

बीड दि. १ (प्रतिनिधी ) : पुढील आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान अजित पवार बीडमधील व्यापारी आणि उद्योजकांसोबत संवाद साधणार असल्याची माहिती आहे. मात्र या संवाद बैठकीत अजित पवारांसमोर काहीही नकारात्मक बोलू नका असा 'विवेकी ' सल्लाच व्यापारी आणि उद्योजकांच्या प्रतिनिधींना प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिल्याचे सांगितले जाते. आता अजित पवारांसोबत देखील 'स्क्रिप्टेड ' बैठक होणार का असा प्रश्न व्यापारी प्रतिनिधींना पडला आहे.
बीडचे पालकमंत्री अजित पवार हे पुढील आठवड्यात बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांचा बीड जिल्ह्यातील व्यापारी , उद्योजक यांच्याशी चर्चा व्हावी असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. ही बैठक कशी होऊ शकते आणि यात काय  चर्चा व्हावी याची चाचपणी करण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी म्हणे बीडमधील व्यापारी आणि उद्योजकांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीला व्यापारी संघटना, एमआयडीसीमधील उद्योजकांचे प्रतिनिधी, जिनिंग चालकांचे प्रतिनिधी असे मोजके लोक उपस्थित होते . या बैठकीत प्रशासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्र्यांसोबत होऊ घातलेल्या 'संवाद ' बैठकीची माहिती देण्यात आली. या संवादातून आपण बीडसाठी काय करू शकतो याच्या संकल्पना मांडल्या जाव्यात अशी अपेक्षा म्हणे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली. त्यात काही आश्चर्यजनक नव्हते. मात्र त्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उपस्थित प्रतिनिधींना जो 'विवेकी ' सल्ला दिला, त्यामुळे मात्र सारेच चक्रावल्याचे सांगितले जाते . 'या बैठकीत कोणत्याही नकारात्मक बाबी सांगू नका, समस्या मांडू नका, अडचणी सांगण्याचे वेगळे मार्ग असतात, फक्त  आपण चांगले काय करू शकतो तेव्हढे बोला ' असा सल्ला म्हणा किंवा समज प्रशासनाकडून देण्यात आल्याचे सांगितले जाते. उपस्थित प्रतिनिधींपैकी एकाने तर 'हे सारे स्क्रिप्टेड ' होईल असे देखील बोलून दाखविल्याचे सांगितले जाते . मात्र प्रशासनाच्या असल्या 'विवेकी ' सल्ल्यासमोर आता बोलायचे काय आणि करायचे काय असा प्रश्न व्यापारी , उद्योजकांना पडला आहे
.
 

Advertisement

Advertisement