मुंबई : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) व राष्ट्रवादीचे (शरद पवार) आ.जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्या समर्थकांनी विधान भवनाच्या आवारात केलेल्या हाणामारीचे आज सभागृहात पडसाद उमटले. याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून कारवाईची अपेक्षा होती. त्यानुसार अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठी कारवाई केली आहे.
विधानसभा अध्यक्ष (rahul narwekar) राहुल नार्वेकर म्हणाले, आ.जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्याबरोबर विधान भवन परिसरात आलेले अभ्यागत नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत आलेले अभ्यागत सर्जेराव टकले या दोघांचे वर्तन सभागृहाची प्रतिमा व प्रतिष्ठा मलीन करणारे होते. त्यांच्याविरोधात चौकशी करून विशेषाधिकार भंग अवमानाची कारवाई करण्यास्तव मी हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द करत आहे. तसेच या दोघांवर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
विधानसभा अध्यक्षांची सर्व सदस्यांना तंबी
नार्वेकर म्हणाले, “जितेंद्र आव्हाड व गोपीचंद पडळकर या विधानसभा सदस्यांनी देशमुख व टकले या दोन अभ्यागतांना विधान भवनात आणले. त्यांच्या आक्षेपार्ह कृतीमुळे विधिमंडळाची प्रतिमा व प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या दोन्ही विधानसभा सदस्यांनी सभागृहात याप्रकरणी खेद व्यक्त करावा. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची हमी द्यावी. त्याचबरोबर सभागृहाची प्रतिमा व प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल याची काळजी घ्यावी. सभागृहाची प्रतिमा बाधित होईल असे वर्तन सभागृहात व सभागृहाच्या बाहेरही घडणार नाही अशी अपेक्षा मी सर्व सदस्यांकडून बाळगतो.”