नागपूर: येथील बोगस शालार्थ (School id)आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांना एसआयटीने (Sit)अटक केली आहे. या दोघांनी मिळून तीनशे पेक्षा जास्त बोगस शालार्थ आयडी तयार करून शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचे समोर आले आहे.
राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी कथित घोटाळा प्रकरणी (School)जिल्हापरिषद नागपूर येथील शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे (प्राथमिक) व रोहिणी कुंभार (माध्यमिक) यांना अटक झालीय. या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना सायबर पोलिसांनी अटक केली असली तरी मात्र, या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांची न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.एकाचवेळी दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील अपात्र शिक्षक भरती व बनावट शालर्थ आयडी कथित घोटाळा प्रकरणी सदर पोलीस स्टेशन येथे विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे व रोहिणी कुंभार या दोघांना अटक करण्यात आली.
शालार्थ आयडी कथित घोटाळा प्राथमिक शिक्षण विभागातील असून, सिद्धेश्वर काळुसे यांच्या कार्यकाळात एकूण १५४ न्याय प्रविष्ठ शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मूळ शालार्थ आयडी आदेश निर्गमित झाले नसताना सुद्धा त्यांनी स्वतः चे आर्थिक फायद्यासाठी त्यांचे वेतन काढण्याची पुढील प्रक्रिया राबवली. रोहिणी कुंभार या पूर्वी येथे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या येथील २१ मार्च २०२२ ते १५ मार्च २०२४ दरम्यानच्या कार्यकाळात एकूण २४४ शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मूळ शालार्थ आदेश निर्गमित झाले नसताना त्यांनी स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी वेतन काढण्याची प्रक्रिया राबवली. यामुळं त्यांचे वेतन काढण्यात येऊन,शासनाची अंदाजे १०० करोड पेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक झाली, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलाय. यावरून काळुसे व कुंभार यांना या गुन्ह्यात गुरुवारी अटक करण्यात आली.