Advertisement

संघर्षाचं दुसरं नाव: धनंजय

प्रजापत्र | Tuesday, 15/07/2025
बातमी शेअर करा

संजय मालाणी

नेतृत्व, मग ते कोणत्याही क्षेत्रातील असेल, सहज घडत नसतं. त्यासाठी टोकाचा संघर्ष करावाच लागतो. अगदी ज्यांच्याकडे आपण वारसाहक्काने आलेलं नेतृत्व म्हणून पाहतो, त्यांना देखील संघर्ष चुकत नाही. फार तर राजकीय वारसा त्यांचा संघर्ष काहीसा सोपा करीत असतो. मात्र काही नेतृत्व अशी असतात की ज्यांचा संघर्ष कधीच संपत नाही. एका संघर्षातून पुढे येऊन जरा स्थिरता येतेय असं वाटत असतानाच त्यांचा दुसरा संघर्ष सुरु होतो, पण त्या संघर्षातूनही जे नेते स्वतःला सिद्ध करतात, अशा महाराष्ट्रातील मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे धनंजय मुंडे.

मागच्या बारा- तेरा वर्षात धनंजय मुंडे हे नाव राज्याच्या राजकारणातला परवलीचा शब्द बनले होते, अर्थात अजूनही आहे. धनंजय मुंडेंना वगळून राज्याच्या राजकारणाचा पट मांडता येणार नाही हे स्वतः शरद पवारांनी देखील ओळखले होते आणि अजित पवारांना तर याची खात्री होती.बीड जिल्ह्यातून अमरसिंह पंडितांसारखे मित्र धनंजय मुंडेंच्या सोबत उभे राहत होते.  १३ वर्षांपूर्वी आमदार असलेल्या धनंजय मुंडेंनी त्यावेळी राजकारणात आणि समाजात  आभाळाएव्हढी उंची असलेल्या काका गोपीनाथ मुंडेंना राजकीय आव्हान देणं म्हणजे अनेकांच्या दृष्टीने राजकीय आत्महत्या वाटावी असंच होतं , पण राजकारणातलं ते 'वेडं धाडस' त्यावेळी धनंजय मुंडेंनी केलं. असं काही धाडस करणं म्हणजे प्रचंड संघर्ष करावा लागणार हे स्पष्टच होत , हे सांगण्यासाठी काही कोणा ज्योतिषाची आवश्यकता नव्हती, पण धनंजय मुंडेंनी तो संघर्षाचा मार्ग निवडला. संघर्ष इतका टोकाचा होता, की ज्या गावांमध्ये त्यावेळच्या धनंजय नावाच्या युवा नेतृत्वाचे वाजत गाजत सवंगत व्हायचे, बीड जिल्ह्याच्या डोंगरपट्ट्यातील त्याच गावांची धनंजय मुंडेंवर दगड फेकले. त्यांच्यावर प्रचंड सामाजिक दबाव निर्माण केला. गोपीनाथ मुंडेंच्या प्रभावात असलेल्या भागाने धनंजय मुंडेंना स्वीकारणे अवघड होते, मात्र धनंजय मुंडेंनी लोकांचे ते दगड देखील स्वीकारले, सहन केले. आज ना उद्या हे लोक आपल्याला स्वीकारतील याच आशेवर तो सारा संघर्ष होता. नंतरच्या काळात धनंजय मुंडे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते बनले, पुढे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ते मंत्री बनले, राजकारणातले अनेक चढउतार हे अनुभवत गेले, मात्र त्यांचा संघर्ष कधी संपला नाही. कधी राजकारणातला, कधी नात्यातला, कधी मैत्रीतला संघर्ष त्यांना करावा लागला, आजही करतायत. पण कोणत्याच संघर्षाने धनंजय मुंडेंना कधी थकवलं नाही. आणि कोणत्याच संघर्षात त्यांनी एक गोष्ट कधी बाजूला केली नाही, किंवा सोडून दिली नाही, ती म्हणजे जनसंपर्क.
मागच्या काळात राज्यातली राजकीय समीकरणे बदलली, आणि ज्यांना राजकीय विरोध केला, त्यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडेंनी स्वतःला झोकून दिल. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंनी लावलेली यंत्रणा आणि त्यांनी घेतलेली मेहनत साऱ्या जिल्ह्याने अनुभवली. त्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा भलेही पराभव झाला असेल, पण राजकीय परिस्थितीची अपरिहार्यता असेल कदाचित, मुंडे बहीण-भाऊ पुन्हा सोबत आले. आता धनंजय मुंडेंचा संघर्ष संपेल असे वाटत होते. दिवंगत गोपीनाथ मुंडे , त्यांच्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणावर प्रभाव ठेवून होते, तो प्रभाव आता अधिकच वाढेल असे वाटत असतानाच पुन्हा नियतीने वेगळे वळण घेतले. मागच्या सात आठ महिन्यांपासून धनंजय मुंडे खरा संघर्ष करीत आहेत तो नियतीशीच. राजकीय संघर्ष एकवेळ सोपा असतो, पण परिस्थितीशी मांडलेला संघर्ष तितकाच कठीण. महाराष्ट्राच्या राजकारणात धनंजय  मुंडेंना जी ट्रॉलिंग सहन करावी लागली, ती कदाचितच इतर कोणाला सहन करावी लागली असेल. ज्या प्रकरणाच्या आधारे धनंजय मुंडेंवर आरोप झाले आणि त्यांना जणू काही राजकीय सामाजिक जीवनातून बहिष्कृतच करायचं अशी मीडिया ट्रायल आणि ट्रोलिंग झाली, त्या प्रकरणाचा निकाल न्यायालय द्यायचा तो देईल, पण समाजातीलच काहींनी त्यात अगोदरच धनंजय मुंडेंना समाजमाध्यमातून दोषी ठरवून टाकलं. हे सारं उघड्या डोळ्यांनी पाहणं सोपं नसत, मात्र धनंजय मुंडे यांनी हा अनुभव देखील घेतला.
राजकारण, समाजकारणात कधी जनतेला दोष देता येत नाही. राजकारण करणारे लोक वेगवेगळे राजकीय डाव प्रतिडाव टाकत असतात, आणि त्यानुसार जनता वागत असते. त्यामुळे हीच लोकं कधी फुलांची उधळण करतात, कधी शिव्यांची लाखोळी वाहतात, कधी दगड भिरकावतात तर कधी छातीचा कोट करून नेत्यावर येणाऱ्या संकटांना आडवे देखील जातात. हे सारं दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी अनुभवलं होतं , ते आज धनंजय मुंडे अनुभवतायत. मात्र हे सारं असलं, तरी जनता आपल्या नेत्याला ओळखत असते. धनंजय मुंडेंना देखील ते माहित आहे. आजही, भलेही धनंजय मुंडे स्वतः सत्तेत नाहीत, मात्र त्यांच्याकडे जमणारी गर्दी कमी झालेली नाही. आजही मतदारसंघाच्याच नव्हे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आपली कामं घेऊन लोक त्यांच्याकडे येतच असतात आणि धनंजय मुंडे स्वतःच्या व्यक्तिगत अडचणी, आजारपण बाजूला ठेवून त्या कामांचा पाठपुरावा करतातच. असंही दिवंगत गोपीनाथ मुंडेंना प्रत्येक्ष सत्तापदांचा लाभ फार कमी काळ घेता आला, पण सत्तेत असो अथवा नसो, त्यांचं मोठेपण कधी कमी झालं नाही. तसेच प्रेम त्यांच्या अनुयायांनी पंकजा मुंडेंवर कायम केलं. राजकारणातले जय पराजय होत असतात, सत्ता येते जाते, पण ज्याला लोकांचं प्रेम टिकविता येत, त्याला कोणताच संघर्ष कठीण नसतो. आज धनंजय मुंडेंच्या बाबतीत तेच म्हणता येईल. आज त्यांच्या भोवती कामे घेऊन येणारी जनता ही फक्त जनता असते, ती कोणत्या एका जातीची नसते, कोणत्या एका धर्माची नसते, ती अडचणीत सापडलेली माणसं असतात आणि आपल्या अडचणीचं समाधान धनंजय मुंडे करतील हा विश्वास घेऊन ती गर्दी आलेली असते. ही गर्दीच धनंजय मुंडेंसाठी  संघर्षातलं बळ ठरेल.

Advertisement

Advertisement