मुंबई :छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून दिली. या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे.
जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या या यादीत महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे ११ किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे.युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ या निकषांवर या १२ किल्ल्यांची निवड झाली. शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व, सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी या मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, संपूर्ण देशवासियांचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत.”युनेस्कोच्या या निर्णयानंतर पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना ते म्हणाले की, “हा ऐतिहासिक निर्णय असून, यामुळे छत्रपती शिवरायांचे कार्य आता जगभरात पोहोचेल.”