Advertisement

गॅरेज चालकाला जीवे मारण्याची धमकी देत लुटले 

प्रजापत्र | Wednesday, 23/07/2025
बातमी शेअर करा

 अंबाजोगाई दि.२३(प्रतिनिधी): शहरातील (Ambajogai) राजीव गांधी चौकात गॅरेज चालवणारे सोमनाथ मदन ढगे यांच्याकडून जबरदस्तीने मोबाईलमधून पैसे ट्रान्सफर करून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवार (दि.२२) दुपारी घडली असून दोघांविरुद्ध (Crime)शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     सोमनाथ ढगे यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि. २२) रोजी दुपारी चारच्या सुमारास ते स्वतःच्या गॅरेजवर काम करत असताना, त्यांच्या ओळखीचा अविनाश देवकर हा तिथे गाडी दुरुस्तीसाठी आला. गाडीत काहीतरी अडचण असल्याचे सांगून त्याने गाडी चालवून पाहण्यास सांगितले आणि स्वतः पाठीमागे बसला. योगेश्वरी नगरीपर्यंत आल्यानंतर अविनाशचा मित्र अजहर अब्दुलरहेमान पठाण हा तेथे उभा असल्याचे दिसून आले. त्यालाही मोटरसायकलवर बसवून हे तिघे पुढे गेले.योगेश्वरी नगरीच्या पुढे असलेल्या तळ्याजवळ त्याने मोटरसायकल थांबविली. याच दरम्यान अविनाशने ढगे यांच्या खिशातून मोबाईल काढून घेतला आणि फोनपेचा पिन नंबर विचारला. सुरुवातीला चुकीचा पिन दिल्यावर अजहरने त्याला विश्वासात घेतल्याचा बहाणा करत दबाव आणला. त्यानंतर अविनाशने जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे भीतीपोटी ढगे यांनी खरा पिन नंबर दिला.पिन मिळाल्यानंतर त्यांनी ढगे यांच्या (Phonpe)फोनपे अकाउंटमधून तीन व्यवहारातून एकूण ८४ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत ढगे यांना यशवंतराव चव्हाण चौकात सोडून ते दोघे पसार झाले. अविनाश देवकर व अजहर अब्दुलरहेमान पठाण या दोघांविरुद्ध (Ambajogai police) अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक आनंद शिंदे करत आहेत.

Advertisement

Advertisement