Advertisement

नीटच्या परीक्षेत कमी गुण मिळाले,संतापलेल्या पित्याने घेतला मुलीचा जीव

प्रजापत्र | Monday, 23/06/2025
बातमी शेअर करा

 सांगली: नीटच्या चाचणी परीक्षेत कमी (Neet exam)गुण मिळाल्याने आणि कमी गुण मिळाल्याबाबत कारण विचारल्यावर उलट उत्तर दिल्याने संतापलेल्या वडिलांनी केलेल्या बेदम मारहाणीत जखमी होऊन या मुलीचा मृत्यु झाल्याची धक्कादायक (Crime)घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडली आहे.  
 
         अधिक माहितीनुसार मृत साधना ही सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातील रहिवासी होती. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या साधना हिला दहावीमध्ये तब्बल ९२.६० टक्के गुण मिळाले होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या नीटच्या चाचणी परीक्षेत तिला कमी गुण मिळाले होते. त्यामुळे माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक असलेले साधनाचे वडील धोंडीराम भोसले यांचा राग अनावर झाला.(Neet exam) ‘’नीटच्या सराव परीक्षेत एवढे कमी गुण कसे काय मिळाले, अशाने तू डॉक्टर कशी होणार?’’ अशी विचारणा त्यांनी केली. तेव्हा साधनाने ‘’तुम्हालाही कमी गुण मिळायचे, तुम्हीतरी शिकून कुठे कलेक्टर झालात?’’, असं उलट उत्तर वडिलांना दिलं.

साधनाने उलट उत्तर दिल्याने वडील धोंडीराम भोसले यांचा राग (Crime)अनावर झाला. संतप्त झालेल्या धोंडीराम यांनी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधना हिला बेदम मारहाण केली. तेव्हा त्यांच्या पत्नीने मध्ये पडून त्यांना थांबवले. मात्र काही वेळाने त्यांनी साधना हिला पुन्हा मारहाण केली. एवढंच नाही तर शुक्रवारी रात्रभर ते तिला मारहाण करत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते उठून शाळेत योग दिनाच्या कार्यक्रमाला गेले होते. घरी परतल्यावर साधना ही त्यांना बेशुद्धावस्थेत दिसून आली.त्यानंतर घाबरलेल्या धोंडीराम भोसले यांनी साधना हिला सांगली येथील दवाखान्यात उपचारांसाठी नेले. साधना ही बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचे सांगत त्यांनी तिला उपचारांसाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे उपचार घेण्यापूर्वीच साधना हिचा मृत्यू झाला. त्यानंतर साधना हिचं शवविच्छेदन केल्यावर तिच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेली चौकशी आणि आईने दिलेल्या तक्रारीनंतर शिक्षक असलेले वडील धोंडीराम भोसले यांना पोलिसांनी अटक केली आहे.  

Advertisement

Advertisement