नवी दिल्ली: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त टिपणी करणारे मध्य प्रदेशचे (vijay shah) मंत्री विजय शहा यांना (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कठोर शब्दांत फटकारले. ‘मंत्री असूनही तुम्ही कसली भाषा वापरता, कर्नल सोफिया (sophia qureshi) यांची माफी मागा,’ अशा शब्दांत न्यायालयाने शहा यांना सुनावले.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्याविरोधात शहा यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र त्यांना तूर्त दिलासा देण्यास सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नकार दिला. (vijay shah) शहा यांच्या वादग्रस्त विधानाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महूमधील मानपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
देश कोणत्या स्थितीतून चालला आहे, याची तुम्हाला माहिती आहे, अशावेळी घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने जास्त जबाबदार राहणे आवश्यक आहे. काय बोलत आहात, याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे.घटनात्मक पदांवरील लोकांकडून संयम बाळगण्याची अपेक्षा केली जाते, असा शेरा सरन्यायाधीश गवई यांना शहा यांना उद्देशून मारला. दरम्यान शहा यांच्या विनंती याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेतली जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.