सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra HSC Results ) इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर केला. यंदाचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला असून, मागील वर्षाच्या तुलनेत निकालात 1.49 टक्क्यांची घसरण झाली आहे. फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये हा निकाल 93.37 टक्के होता. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून, त्याची यशाची टक्केवारी 96.74 आहे. दुसरीकडे, सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा असून तो 89.46 टक्के आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात मुलांना मागे टाकले आहे. 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांचा निकाल 89.51 टक्के आहे. मुलींच्या निकालात मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी अधिक वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक होत असताना सांगली जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचा निकाल विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.
आटपाडी तालुक्यातील कौठुळी गावातील हेमंत किरण सटाले या (Maharashtra HSC Results ) विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेमध्ये सर्व विषयांमध्ये ३५ गुण मिळवत एक वेगळीच चर्चा निर्माण केली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमातील टेक्नॉलॉजी विभागामध्ये हेमंतचा विद्यार्थी आहे. त्याने दिघंची येथील इंद्रभाग्य पद्मिनी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. हेमंतने ज्या विषयांमध्ये परीक्षा दिली त्यामध्ये इंग्रजी, मराठी, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, वर्कशॉप सायन्स अँड कॅल्क्युलेशन, ट्रेड थिअरी आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल्स यांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे, या सर्वच विषयांमध्ये त्याला केवळ पासिंग मार्क म्हणजेच ३५ गुणच मिळाले आहेत. आता हेमंत सटालेच्या मार्क्सशी जोरदार चर्चा रंगली आहे.