Advertisement

अनेक दिवसांपासून प्रलंबित संचिकांना शेवटच्या दिवशी 'लाखमोलाची' मंजुरी

प्रजापत्र | Friday, 25/04/2025
बातमी शेअर करा

 बीड दि. २४ (प्रतिनिधी ) : अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश येताच अनेक दिवस बाजूला पडलेल्या  अथवा ठेवलेल्या संचिकांचे नशीब अचानक पालटते असा अनुभव जुनाच आहे. बीडमध्ये बुधवारी त्याची पुनरावृत्ती झाली. मंगळवारी सायंकाळी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या बदलीचे आदेश आले आणि मग मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयातीलप्रलंबित संचिकांना जणू पंख फुटले. गौण खनिज, भूसंपादन लवाद आणि इतर अनेक विभागाच्या प्रलंबित संचिकांवर बुधवारी लाखमोलाच्या मंजुरीची स्वाक्षरी झाली. पदभार सोडण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या गतिमान प्रशासनाची सध्या महसूल वर्तुळात चवीने चर्चा सुरु आहे.
बीडच्या जिल्हा प्रशासनात मागच्या काही काळात अनेक विषयात अनागोंदीचे स्वरूप होते. बीड जिल्ह्यात खडीक्रशर च्या नूतनीकरणाचा विषय असेल किंवा इतर काही बाबी, त्यासंदर्भातील संचिकांवर अनेक दिवस निर्णयच होत नव्हता , भूसंपादन लवादाचे देखील अनेक विषय प्रलंबित होते. खडीक्रशरच्या बाबतीत तर संबंधित व्यक्ती शासनाला महसूल भरायला तयार असताना संचिका प्रलंबित ठेवल्या जात होत्या . मात्र मंगळवारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या बदलीचे आदेश काय, या साऱ्या संचिकांचे रूपच पालटले . मंगळवारी सायंकाळनंतर अनेक संचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे आणण्यात आल्या. यासाठी त्यांच्या मर्जीतल्या काही कर्मचाऱ्यांना मोठी धावपळ देखील करावी लागली. आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित संचिकांवर अखेर मंगळवारी सायंकाळपासून ते बुधवारपर्यंत मंजुरीची 'लाखमोलाची' 'अविनाशी ' स्वाक्षरी झाली. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास  टाकला असला तरी मग इतक्या दिवस या संचिका प्रलंबित का ठेवण्यात आल्या होत्या याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.
एकीकडे काही संचिकांना असे पंख फुटले असतानाच दुसरीकडे महत्वाच्या विषयातील काही संचिका मात्र 'वादाचा विषय ' असल्याचे सांगत जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आल्याचीही माहिती आहे. अचानक काही संचिकांनाच कसे काय प्राधान्य दिले जाते आणि या संचिकांच्या 'मोहा 'त नेमके कोण कोण पडले होते याच्या सुरस चर्चा सध्या जिल्हाप्रशासनात सुरु आहेत.

Advertisement

Advertisement