उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याने ऊर्जा कंपन्यांची दहशत उघड
बीड दि.23 (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यात मागतच्या काही काळात पवन आणि सौर ऊर्जा कंपन्यांची दादागिरी रोजची झाली आहे. या कंपन्यांनी प्रशासनाला हाताशी धरून शेतकऱ्यांवर दहशत माजविली आहे. त्यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारींची देखील दखल घेतली जात नाही. याच दहशतीचा आणखी एक नमुना विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीच समोर मांडला आहे. ऊर्जा कंपन्यांच्या दादागिरीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ' कंपन्यांबद्दल तक्रारी करूनही आमचे दोन जिल्हाप्रमुख जिवंत आहेत हेच नशीब, ऊर्जा कंपन्यांचा विषय खूप मोठा आहे , त्यावर बोलायला आपण फार लहान माणसं आहोत ' असे उत्तर नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे.
बीड जिल्ह्यात ऊर्जा कंपन्यांच्या दादागिरीला शेतकरी वैतागले आहेत. पवन आणि सौर ऊर्जा कंपन्या गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या सेहतत मनमानी करीत आहेत. खाजगी बाउन्सर शेतकऱ्यांच्या शेतात घुसवून जबरदस्तीने तारा ओढल्या जात आहेत. या कंपन्यांनी पोलीस आणि प्रशासन आपल्या दिमतीला घेतले आहे, इतके की एका गावात जिल्हाधिकाऱ्यांना एका शेतकऱ्याने चक्क 'तुम्ही जिल्हाधिकारी आहात का कंपन्यांचे दलाल ? ' असा सवाल विचारला होता. ऊर्जा कंपन्यांच्या या दादागिरीबद्दल 'प्रजापत्र ' ने सातत्याने प्रकाश टाकला आहे.
बीड जिल्हा दौऱ्यावर असलेल्या विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनाही यासंदर्भात प्रश्न विचारला होता. या ऊर्जा कंपन्यांविरुद्ध केलेल्या तक्रारींची प्रशासन दाखल घेत नाही , शिवसेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखानी देखील तक्रारी केल्या आहेत या प्रश्नावर उत्तर देताना खुद्द नीलम गोऱ्हे देखील हतबल झाल्याचे दिसले. ' तक्रारी करूनही दोन्ही जिल्हाप्रमुख जिवंत आहेत याबद्दल अभिनंदन ' असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. तसेच हा विषय खूप मोठा आहे, त्यावर बोलायला आपण खूप लहान आहोत असे सांगून तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत त्यांनी या विषयाला बगल दिली. यावरूनच आता जिल्ह्यात ऊर्जा कंपन्यांच्या सुरु असलेल्या दादागिरीवरच शिक्कामोर्तब झाले आहे.
बातमी शेअर करा