अंबाजोगाई दि.२२(प्रतिनिधी): तालुक्यातील जवळगाव येथील गायरान प्रश्नी मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यापूर्वीही येथील गायरान जमिणीवर ताबा असलेल्या काहींनी विष प्राशन केले होते. तर आज (दि.२२) मंगळवार रोजी एका युवकाने तहसील कार्यालयातील टॉवरवर चढून आंदोलन केले.
हे आंदोलन तीन तास चालले असून, यामुळे सकाळीच तालुका प्रशासनाची तारांबळ उडाली होती. आंदोलकांनी यापूर्वीच निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला असल्याने तहसील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जवळगाव (ता. अंबाजोगाई) येथील गायरान जमीन कसून काही कुटुंब मागील ४० वर्षांपासून आपली उपजीविका भागवित आहेत. पण शासन आणि प्रशासनाने हे गायरान सौरऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीच्या घशात घातले आहे. तेथे संबंधित कंपनीने प्रकल्प उभारणीचे काम सुरू केले आहे. यामुळे या कुटुंबाचा जगण्याचा आधार जाणार असून, यांची लेकरं रस्त्यावर आली आहेत. यामुळे गायरान जमिनीवर ताबा असणाऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे.यामुळेच येथील गायरान धारकांनी हे अनोखे आंदोलन केले .