Advertisement

 बीड दि. ७ (प्रतिनिधी ) : केंद्र सरकारने सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविण्याची सक्ती केली आहे. मात्र याचे दर महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. या दराला आव्हान देणाऱ्या याचिकेवर या महिनाअखेर उच्च न्यायालयाचा निर्णय येणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही नंबरप्लेट बसविणे आवश्यक असले तरी यासाठी ३० जूनची मुदत असल्याने किमान एप्रिल अखेर पर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करायला हरकत नाही.
देशभर सध्या एचएसआरपी अर्थात उच्च सुरक्षा नोंदणी पट्टी बसविण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी सुरुवातीला असलेल्या मुदतीमध्ये आता वाढ करण्यात आली असून महाराष्ट्रात ही नंबरप्लेट बसवायला जून अखेर्पयंतची मुदत देण्यात आली आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेच या नंबरप्लेट संदर्भातील कारवाई सुरु आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वाहनावर ही एचएसआरपी बसविणे आवश्यक आहेच. ती बसवावी लागणारच आहे. मात्र महाराष्ट्रात या नंबरप्लेटचे दर इतर राज्यांच्या तुलनेत बरेच अधिक आहेत.
शेजारच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात हे दर जास्त असल्याने या दराला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्याच्या परिवहन आयुक्तांना दराच्या संदर्भाने तीन आठवड्यात आपले म्हणणे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच इतर राज्यांना जमते ते महाराष्ट्राला का नाही याची देखील विचारणा केली आहे. त्यामुळे आता नंबरप्लेटचे दर कमी होण्याच्या संदर्भाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्यास हरकत नाही. असेही नंबरप्लेट बसविण्यासाठी ३० जूनची मुदत आहे. त्यामुळे एप्रिल अकहरपर्यंत या दराच्या संदर्भाने काही निर्णय येतो का यासाठी जरा थांबा ची भूमिका घेण्यास हरकत नाही . नंबरप्लेट तर बसवायचीच आहे, मात्र दर कमी होणार असतील तर प्रतीक्षा करायला काही हरकत नाही.

 

म्हणायला उच्च सुरक्षा , पण प्लेट तकलादू
या एचएसआरपीच्या संदर्भाने वाहनधारकांचा छळ करण्याचेच प्रकार सध्या सुरु आहेत. याचे कंत्राट ज्यांना देण्यात आले आहे, त्यांच्याकडून वारेमाप शुल्क वसूल करूनही अत्यंत तकलादू नंबरप्लेट दिल्या जात आहेत. या नंबरप्लेटचे पैसे दिल्यानंतर पुन्हा 'उच्च सुरक्षा ' म्हणून दिलेल्या या पट्टीच्या सुरक्षेसाठी वेगळे प्लास्टिक घ्यावे लागत असून त्यासाठी पुन्हा दीडशे ते दोनशे रुपये खर्चण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.

 

 

 

ऑनलाईन बोगसगिरी
एचएसआरपीचा निर्णय झाल्यामुळे आता काही संकेतस्थळांवरून बोगसगिरी देखील सुरु आहे. आम्ही एचएसआरपी पुरवितो असा दावा करणारी काही संकेतस्थळे सुरु आहेत. त्यावर ग्राहकाला एखादा फोनपे क्रमांक देऊन पैसे भरून घेतले जातात मात्र नंतर नंबरप्लेटच येत नाही. विशेष म्हणजे त्या संकेत स्थळावर दिलेल्या क्रमांकावर फोने केल्यास प्रत्येकवेळी दुसरा क्रमांक दिला जातो , दुसरा तिसऱ्याला आणि तिसरा चौथ्याला बोलायला सांगतो असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना खातरजमा करण्याची आवश्यकता आहे.

 

Advertisement

Advertisement