Advertisement

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे स्टेअरिंग 'शिवछत्र'च्या हाती!            

प्रजापत्र | Friday, 04/04/2025
बातमी शेअर करा

बीड दि. ३ (प्रतिनिधी): अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मागच्या काही काळात बीड जिल्ह्यात मरगळ आलीय होती आणि काही काळ बॅकफूटवर देखील जावे लागले होते. बरखास्त करण्यात आलेली जिल्ह्याची कार्यकारिणी, नेत्यांचे असलेले मौन आणि कार्यकर्त्यांची अस्वस्थता या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी सवथ अजित पवारांनी बीडमध्ये पक्षच्या कार्यकर्त्यांसाठी वेळ दिला , अजित पवारांच्या या दौऱ्यावर मोठ्याप्रमाणावर प्रभाव जाणवला तो माजी आ. अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडितांचा. त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे स्टेअरिंग 'शिवछत्र' परिवाराच्या हाती जात असल्याचे संकेत मिळत आहेत.
बीडच्या राजकारणात दीर्घकाळ क्षीरसागर कुटुंबाचे राजकीय वर्चस्व राहिले, नंतरच्या काळात दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि मग पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याभोवती जिल्ह्याचे राजकारण फिरत आले. माजी राज्यमंत्री शिवाजीराव पंडित यांचा राजकारणातील प्रभाव मोठा असला तरी पंडित कुटुंबाने कधी संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही. भलेही राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाचे पहिले जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पंडित झाले असतील , मात्र पंडित कुटुंबाने स्वतःला गेवराई मतदारसंघाच्या मर्यादेतच ठेवले होते हे वास्तव आहे.
तसे पाहायला गेले तर माजी आ. अमरसिंह पंडित एकत्रित राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार दोघांच्याही मर्जीतले अन विश्वासातले. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर त्यांच्या शब्दाला मोठे वजन असायचे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी 'परमश्रध्देय' ऐवजी 'श्रद्धेय ' अजित पवारांसोबत जाण्याचा  निर्णय घेतला. त्यामुळे तर ते अजित पवारांच्या अधिकच मर्जीत गेले. गेवराई मतदारसंघातून पक्षाने विजयसिंह पंडित यांना उमेदवारी दिली आणि ते निवडून देखील आले. तरी देखील शिवछत्र परिवार मतदारसंघाच्या बाहेर जाण्याच्या फारशा फंद्यात पडला नव्हता. नाही म्हणायला भवानीच्या भक्तांची कधी गोरक्षनाथ टेकडीवर तर कधी नारायणगडावर भेट व्हायची, पण ते तेव्हढ्यापुरतेच . अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जिल्ह्यातला चेहरा म्हणून धनंजय मुंडे होते . आता मात्र परिस्थितीने वेगळे वळण घेतले आहे. मधल्या काही काळात धनंजय मुंडे यांच्या राजकीय अडचणी वाढल्या आणि ते सध्या प्रकृतीच्या आणि इतर कारणांनी राजकीय विजनवासात असल्यासारखे आहेत. अशावेळी पक्षातील कार्यकर्त्यांनी पाहायचे कोणाकडे हाच प्रश्न निर्माण झालेला होता. पक्षाचे जिल्ह्यात ३ आमदार, पण मागच्या काळात कार्यकर्ते मात्र सैरभैर झाल्याचे चित्र होते. ते सावरण्यासाठी आता माजी आ. अमरसिंह पंडितांनी पुढाकार घेतला असल्याचे आणि त्यांना आ. विजयसिंह पंडित साथ देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यातून ते अधिक स्पष्ट झाले आहे. अजित पवारांना लहान मोठ्या कार्यकर्त्यांपर्यंत घेऊन जाण्याचे नियोजन शिवछ्त्रवरून झाल्याचे सांगितले जाते. बळीराम गवतेंनी युवक मेळावा यशस्वी करून दाखविला, त्यांना  देखील शिवछत्रची साथ होती, शेख निजाम यांचा प्रवेश देखील शिवछ्त्रच्याच प्रेरणेतून घडला , बाकी अमर नाईकवाडे , फारूक पटेल यांचेही शिवछ्त्रशी चांगले नाते आहे, एकूण काय तर पक्षासोबत लोकांची फळी जोडण्यासाठी आता शिवछ्त्र आघाडीवर आहे. अजित पवारांच्या दौऱ्यात ते जाणवलंच आणि प्रशासनात देखील अजित पवारांनी इतर लोकप्रतिनिधींच्या तुलनेत आ. विजयसिंह पंडित यांना दिलेली मोकळीक आता चर्चेचा विषय ठरली आहे. एकंदर अस्वस्थ राष्ट्रवादीचे स्टिअरिंग हाती घेऊन 'शिवछ्त्र' परिवार त्या पक्षाला जिल्ह्यात स्थिरता देणार का हाच आता राजकीय चर्चेचा मुद्दा आहे.
 

Advertisement

Advertisement