Advertisement

संपादकीय - माज उतरला पाहिजे

प्रजापत्र | Monday, 17/03/2025
बातमी शेअर करा

संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांच्या हत्येचे पाहवणार नाहीत असे फोटो समोर आले होते, त्यानंतर अनेक ठिकाणचे मारहाणीचे वेगवेगळे व्हिडीओ समोर येत आहेत. यामागे कोणते राजकारण असो किंवा नसो, पण हिंसा आणि माज किती भिनला आहे हे दाखवायला हे सारे पुरेसे आहे, त्यातच आष्टी तालुक्यातील अमानुष(Beed) मारहाणीत मृत्यू झाल्याचे एक प्रकरण समोर आले, दुसरीकडे १८ वर्ष बिनपगारी काम केलेल्या शिक्षकाला एखादा संस्थाचालक सरळ 'तू फाशी घे ' म्हणतो हा उद्दामपणा आणि मस्तवालपणा देखील पाहायला मिळतो, आम्ही व्यवस्थेपेक्षा मोठे आहोत आणि आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही, या माजातून हे सारे होत आहे. हा माज खरोखर उतरला पाहिजे .
 

संतोष देशमुख यांची (santosh deshmukh)झालेली हत्या मानवतेवरचा कलंक होती यात कसलाच संशय नाही. त्या प्रकरणाचा वारंवार उल्लेख यासाठी करायचा की ते प्रकरण राज्यपातळीवर चर्चेत आले. त्या प्रकरणावरून गुन्हेगारीचे निर्देशांक ठरविले गेले. मात्र बीड (Beed)जिल्ह्यात काय किंवा राज्याच्या इतर भागात काय, सामान्यांचे शोषण, सामान्यांना होणारी मारहाण नवीन राहिलेली नाही, आणि वेगवेगळ्या भागात हे सुरूच आहे हे दाखविणारी अनेक प्रकरणे नंतर समोर येत गेली. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या काळात हा सारा मस्तवालपणा घडत होता, घडत आलेला आहे हे दाखविणारी हि सारी प्रकरणे आहेत . हे कमी का काय म्हणून आता (Ashti)आष्टी तालुक्यात एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचे आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुळात आपण कायदा हातात घेऊन कोणाला तरी शिक्षा द्यावी, कोणालाही मारहाण करण्याचा अधिकार आपल्याला आहे, ही जी मानसिकता मागच्या काळात वाढीस लागली आहे, त्याचे हे परिणाम आहेत . सामन्यांमध्ये अशी मानसिकता रुजण्यामागे व्यवस्थेतील अनेकांचा हातभार आहे. ज्या व्यवस्थांवर सामान्यांना न्याय देण्याची, सामान्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, तेथून ते होईलच याबद्दलचा विश्वास मागच्या काळात कमी कमी होत गेला आहे आणि त्यामुळे आपणच कायदा हातात घ्यायचा अशी मानसिकता वाढीस गेली आणि पुढे त्याचे रूपांतर 'आम्ही म्हणजेच कायदा ' असे झाले. असा माज डोक्यात घेऊन फिरणारांना कायद्याची भीती वाटेल असा संदेश देण्यात मागच्या काही काळात साऱ्याच व्यवस्था कमी पडल्या आहेत. त्यामुळे (Beed)संतोष देशमुख काय किंवा इतर सराफी प्रकरणे काय, त्यात व्यवस्थेचा दोष देखील आहेच.
काही व्यक्ती कायद्यापेक्षाही मोठे आहेत आणि कायदाही त्यांचे काही बिघडवू शकत नाही असा संदेश अनेक प्रकरणात व्यवस्थेमधीलच वेगवेगळ्या घटकांनी दिला. समाजात 'दादा ' म्हणून मिरविणाऱ्या गुंडांना पोलीस ठाण्यात मिळणारी सन्मानाची वागणूक असेल, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून व्यवस्थेचे रक्षकच दाखविणारी जवळीक असेल, मग गुंडगिरीचा माज डोक्यात जायला वेळ तो कितीसा लागणार ? त्यातूनच मग गुन्हेगारीमधून का होईना 'नाव झाले पाहिजे ' अशी मानसिकता वाढीस लागली आणि त्यातूनच मग असले प्रकार समोर येत आहेत.
राजकारणाच्या संरक्षणातली गुन्हेगारी हा एक विषय, दुसरा म्हणजे राजकारण्यांची पांढरपेशी गुन्हेगारी. त्यांना चढलेला सत्तेचा माज . सत्ता सोबत असेल तर आपण काहीही पचवू शकतो अशीच मानसिकता मागच्या काही काळात काही पुढाऱ्यांमध्ये रुजली आहे. धनंजय  नागरगोजे हे त्या मानसिकतेचे बळी ठरलेत. एखादा संस्था चालक इतका मग्रूरहोतो की १८ वर्ष सोबत काम करणाऱ्या व्यक्तीला खुशाल तू फाशी घे असे म्हणतो हे सारेच सत्तेचा माज  चढल्याचे लक्षण आहे. हा माज अचानक किंवा एका दिवसात चढत नसतो , या लोकांनी शासनाचा निधी ढापला, कोणावर प्राणघातक हल्ले केले तरी काहीच होत नाही, सांस्थानच्या माध्यमातून कोणाची फसवणूक केली तरी काही बिघडत नाही. फार तर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायचे आणि कारवाया टाळायच्या , कागदी घोडे नाचवत बसायचे, समोरचा पीडित व्यक्ती यांच्या सत्ता आणि संपत्तीच्या मस्तवालपणाला कितीसा पुरणार हेच केजच्या मुंडे पिता पुत्रांच्या बाबतीत घडले. ज्यावेळी शासनाच्या सामाजिक सभागृहाचा निधी ढापला गेला त्यावेळी तडकाफडकी यांच्यावर फौजदारी कारवाई झाली असती , ज्यावेळी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला त्यावेळी कठोर कारवाई झाली असती तर कदाचित 'आपण काहीही करू, आपले कोण काय वाकडे करणार ' असा मस्तवालपणा यांच्यात आला नसता. पण आपल्या(Beed) व्यवस्थेनेच असले माजोरडे  आणि मस्तवाल निर्माण केले आहेत आणि त्यांच्यामुळे सामाजिक स्वास्थ्याला,किंबहुना संपूर्ण समाजव्यवस्थेलाच धोका निर्माण झाला आहे. अशा साऱ्याच माजोरड्यांचा माज उतरला पाहिजे
.

Advertisement

Advertisement