बीड दि. १२ (प्रतिनिधी ): शहरातील महत्वाच्या असणाऱ्या (Nagar)नगर महामार्गाचे संथ गतीने सुरु असलेले काम आणि त्यामुळे सामान्यांना येणाऱ्या अडचणी यावर अखेर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय बडगा उगारला आहे. या कामाच्या कंत्राटदारास नियमित दंडाव्यतिरिक्त सुमारे १ कोटींचा अतिरिक्त दंड आकारा आणि कोणत्याही परिस्थितीत एक आठवड्याच्या आत सदरचे काम पूर्ण करायला सांगा असे पत्र जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बीड(Beed) शहरातून जाणाऱ्या बीड- नगर महामार्गाचे शहरातील काम सध्या नागरिकांची डोके दुखी बनले आहे. एकतर हे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे, त्यातच कंत्राटदार नागडीच मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. कोणत्या क्षणी कोठून रस्ता बंद केला जाईल आणि कोठे खोदले जाईल याचा काहीच ताळमेळ नसल्याचे चित्र आहे. कंत्राटदाराच्या मनात येईल तेव्हा मनात येईल तेथे बॅरिकेटिंग करायची आणि मनात येईल तेथून काम सुरु किंवा बंद करायचे असे प्रकार सुरु आहेत.
त्याचा परिणाम शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. या रस्त्यावर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत , न्यायालय आदी महत्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे येथे वर्दळ देखील अधिक असते. मात्र कंत्राटदारास याचे काहीच देणेघेणे नाही. त्यांच्या मनमानीमुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून सामान्यांचे हाल होत आहेत.
यासंदर्भात मोठ्याप्रमाणावर ओरड झाल्यानंतर आता बीडच्या (Beed)जिल्हाधिकाऱ्यांनीच यासंदर्भाने कठोर भूमिका घेतली आहे. बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन कंत्राटदाराची मनमानी थांबविण्याचे सुचविले आहे. सदर काम कोणत्याही परिस्थितीत १ आठवड्याच्या आत पूर्ण करण्याचे तसेच कंत्राटदारास १ कोटींचा अतिरिक्त दंड करण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. आतातरी निगरगट्ट कंत्राटदार आणि त्याची पाठराखण करणाऱ्या महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जाग येते का नाही पाहणे महत्वाचे आहे.

बातमी शेअर करा