बीड दि.९ (प्रतिनिधी)-:पोलीस दलातील कर्मचाऱ्याची जात समजू नये आणि जातीच्या आधारावरची अस्वस्थता कमी व्हावी या हेतूने पोलीसांच्या गणवेशावरच्या नावपट्टीवर फक्त पहिले नाव लिहण्याची संकल्पना बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत राबवित आहेत.त्यांच्या हेतूबद्दल संशय घेण्याचे काही कारण नाही, त्यांचा उद्देश देखील चांगला आहे,पण आता हा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसवायचा कसा? पोलीस मॅन्युअलच्या नियमांना बगल देऊन उचललेल्या या पावलाने उद्या अनेक किचकट प्रश्न निर्माण होतील त्याचे काय?
बीड जिल्ह्यातील सामाजिक वातावरण मागच्या काळात कमालीचे अस्वस्थ करणारे आहे.अगदी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी यांची जात काढण्याचे प्रकार झाले. तशा याद्या समाजमाध्यमात व्हायरल झाल्या.त्या पार्श्वभूमीवर बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत यांनी पोलीस दलातील व्यक्तीची ओळखच एकेरी नावाने व्हावी अशी संकल्पना मांडली,आता पोलीस अधिक्षकांचीच संकल्पना म्हणल्यावर अंमलबजावणीला वेळ तो काय लागणार? झपाट्याने पोलीसांच्या गणवेशावरची नेमप्लेटच बदलली आणि आता केवळ एकेरी नावाचा उल्लेख असलेली नेमप्लेट पोलीसांच्या गणवेशावर चढली आहे.
आडनावावरून जात कळु नये किंवा जातीवरून पोलीसांच्या कृतीचा अर्थ लावला जाऊ नये यासाठीची पोलीस अधिक्षकांची तळमळ समजू शकते, मात्र मुळातच जात हे या समाजातले कटु वास्तव असून केवळ नेमप्लेट वरुन आडनाव काढल्याने जात जाईल हा भाबडेपणा आहे. त्या पलीकडे जाऊन या निर्णयाचे भविष्यातील परिणाम मात्र कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढविणारे असतील.
पोलीसांच्या गणवेशावर असलेली नेमप्लेट हा गणवेशाचा एक भाग आहे आणि ती कशी असावी हे पोलीस मॅन्युअलने स्पष्ट केले आहे. नेमप्लेटचा आकार , त्यावरील नावाच्या शब्दांचा आकार, नावाचा क्रम हे सारे पोलीस मॅन्युअलने स्पष्ट केलेले आहे, आणि त्यात बदल करण्याचा अधिकार घटक प्रमुखांना नाही.
भारतीय न्याय संहितेप्रमाणे एखाद्या आरोपीला अटक करताना किंवा इतर कोणती कारवाई करताना पोलीस कर्मचारी पुर्ण गणवेशात असणे आवश्यक आहे. आता एकेरी नावाची नेमप्लेट उद्या पुर्ण गणवेश या तांत्रिक संकल्पनेत बसणार नाही. नेमप्लेटवर 'कुलनाम' म्हणजे आपल्याकडील आडनाव आवश्यक असल्याचे मॅन्युअल सांगते, मग केवळ नावावर कसे भागणार? भविष्यात केवळ नाव असलेल्या व्यक्तीने केलेल्या पंचनाम्यावर उल्लेख कसा करायचा? पंचांना पुर्ण ओळख कशी पटणार? याच तांत्रिक मुद्द्याच्या आधारे भविष्यात एखादी अटक किंवा कारवाई न्यायालयीन प्रक्रियेत अवैध ठरली तर काय करायचे? पुराव्याच्या किंवा साक्षीच्या संदर्भाने उद्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास काय या साऱ्या प्रश्नांचा विचार कदाचित पोलीस अधीक्षकांनी केला असेलही, पण सामान्य पोलीस कर्मचाऱ्याला आणि अधिकाऱ्यांना याची उत्तरे कोण देणार? शेवटी हा प्रकार रोगापेक्षा इलाज जालीम ठरु नये इतकीच अपेक्षा.
ओळख पटविण्यासाठी असते नेमप्लेट
पोलीसांच्या गणवेशावरील नेमप्लेट ही ओळख पटविण्यासाठी असते. पोलिसांकडून सामान्यांच्या अधिकाराचे हणन होऊ नये आणि कारवाई कोण करतेय हे नागरिकाला कळावे हा त्याचा हेतू आहे. आता एकेरी नाव वापरले गेल्यास तो ओळख लपविण्याचा प्रकार होणार नाही का? आणि त्याचा भविष्यात गैरफायदा उठविला गेला तर जबाबदारी कोणाची? एका ठाण्यात एकाच नावाचे चार पाच कर्मचारी असतील आणि त्यातील कोणाबद्दल तक्रार करायची वेळ आली तर तक्रार करायची कशी? अशा अनेक प्रश्नांना पोलीस दलाला सामोरे जावे लागणार आहे.