Advertisement

'गोपनीय साक्षीदारां'वर  (Confidential witness) खटल्याची भिस्त

प्रजापत्र | Monday, 03/03/2025
बातमी शेअर करा

  बीड दि.२ (प्रतिनिधी)-संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे(Santosh Deshmukh murder) दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी या खटल्यात सुमारे पाच गोपनीय साक्षीदार तपासल्याचे म्हटले आहे.त्यामुळे गोपनीय साक्षीदार या विषयाची चर्चा जोरात सुरु आहे.अशा प्रकरणात गोपनीय साक्षीदारांवरच खटल्याची भिस्त बऱ्यापैकी अवलंबून असते आणि ते खटल्याला वेगळी कलाटणी देखील देऊ शकत असतात.
 
काय असतात गोपनीय साक्षीदार ?
गोपनीय साक्षीदार हे बहुतांशवेळा खटल्याशी संबंधित व्यक्तीच्या निकटवर्तीय वर्तुळातले(Close aid)असतात.त्यांची नावे सुरुवातीलाच उघड झाली तर त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो.आपल्या न्यायव्यवस्थेत साक्षीदाराच्या सुरक्षेला देखील सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे,त्यामुळेच अनेकदा संवेदनशील प्रकरणात काही साक्षीदारांनी त्यांना गोपनीय ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केल्यास त्यांना गोपनीय साक्षीदार म्हणून समजले जाते आणि त्यांची नावे दोषारोपपत्रात(Chargesheet) दाखविली जात नाहीत.

कधी समोर येतात गोपनीय साक्षीदार ?
दोषारोपपत्रामध्ये जरी गोपनीय साक्षीदाराची ओळख लपविण्यात आलेली असली तरी प्रत्यक्ष खटला सुरु झाल्यानंतर त्यांची तपासणी सामान्य साक्षीदाराप्रमाणेच होते.फक्त खटल्यातील साक्षी पुरावे सुरु होण्याच्या वेळी बचाव पक्षाला गोपनीय साक्षीदारांची(Confidential witness) नावे समजतात.

 

अभियोग पक्ष घेऊ शकतो ताबा
गोपनीय साक्षीदाराची सुरक्षा अबाधित राहावी आणि त्यांच्यावर दबाव आणला जाऊ नये यासाठी अभियोग पक्ष म्हणजे पोलीस अशा गोपनीय साक्षीदाराचा सुरक्षेसाठी ताबा देखील घेऊ शकतात.त्याला लीगल कस्टडी(legal custody) असे म्हटले जाते.अशावेळी ते साक्षीदार पोलिसांच्या निगराणीत राहतात. त्यांच्या वागण्यावर मात्र कोणतेही निर्बंध लावता येत नाहीत.

 

तपासणी कशी होते ?
गोपनीय साक्षीदार असले तरी पुरावा अधिनियमाप्रमाणे त्यांना इतर साक्षीदाराप्रमाणेच साक्ष नोंदविणे आणि उलटतपासणी याला सामोरे जावे लागते.त्यातून त्यांना कसलीही सवलत मिळत नाही. मात्र गोपनीय साक्षीदाराने मागणी केल्यास साक्ष नोंदविणे आणि उलटतपासणी खुल्या न्यायालयात न घेता न्यायाधीशांच्या कक्षात (In chamber) घेण्यासंदर्भाने न्यायालय निर्णय घेऊ शकते .

 

Advertisement

Advertisement