बीड दि. २८ (प्रतिनिधी ): अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आता बीड शहराला आणखी एक एमआयडीसी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. बीडमध्ये सध्या असलेल्या एमआयडीसीमध्ये आता नवीन उद्योगांना देण्यासाठी जागा उपलब्ध नाही, त्यामुळे शहराच्या भोवती नव्याने एमआयडीसी उभारण्याच्या दिशेने हालचाली सुरु झाल्या आहेत. उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अनेक बैठका देखील घेतल्या असून तीन ठिकाणी जागेची चाचपणी सुरु आहे.
बीड जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढले पाहिजेत अशी अपेक्षा सातत्याने व्यक्त होत आहे. बीडमध्ये सध्या असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये (एमआयडीसी ) आता नवीन उद्योगांना देण्यासाठी भूखंड उपलब्ध नाहीत. येथील बहुतांश उद्योग बंद अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी चक्क्क निवासी बंगले बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता नव्याने उद्योग आणायचे असतील तर नव्याने एमआयडीसी उभारण्याची आवश्यकता सांगितली जात होती.
अजित पवारांकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आल्यानंतर आता त्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. बीड शहराच्या भोवती किंवा जवळपास अशा तीन ठिकाणी उद्योग विभाग जागेची पाहणी करीत आहे. एमआयडीसीसाठी किमान १०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. तशी सलग जागा आणि त्या जागेसाठी दळणवळणाची तसेच पाण्याची सोय अशा गोष्टी कोठे मिळतील याची चाचपणी सुरु आहे. यासाठी उद्योग विभाग आणि एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागच्या काही काळात बीडला भेटी वाढविल्या आहेत. तसेच जागांची मोजणी आणि पाहणी देखील सुरु केली आहे.
येत्या काही दिवसात तिन्ही ठिकाणचे जमीन मोजणी अहवाल उपलब्ध झाल्यानंतर , त्या तीन पैकी एका ठिकाणी एमआयडीसीच्या दृष्टीने पुढील पाऊले उचलली जातील असे अपेक्षिले जात आहे. प्रशासकीय पातळीवर मात्र अद्याप या बाबतीत मोठ्याप्रमाणावर गोपनीयता पाळली जात आहे.
मांजरसुंबा येथे विमानतळ ?
बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यात विमानतळ उभारण्याच्या दृष्टीने हालचाली व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली होती. सध्या बीड शहराच्या सर्व बाजूनी महामार्गांचे जाळे आहेच. आता मांजरसुम्भा परिसरात विमानतळासाठी जागा उपलब्ध करता येऊ शकते का याचा विचार केला जात आहे. बीड विमानसेवेने जोडले गेल्यास या परिसरात नव्याने उद्योग येऊ ष्टील असे अपेक्षिले जात आहे.