Advertisement

आयटीआयला मिळणार आता बारावीचा दर्जा

प्रजापत्र | Sunday, 24/01/2021
बातमी शेअर करा

बीड-औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अर्थात आयटीआयमधून व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आता थेट 12 वि उत्तीर्णच दर्जा मिळणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना भाषा विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे.
ग्रामीण भागात दहावीनंतर आयटीआय मधील व्यवसाय शिक्षण घेण्याची क्रेझ अजूनही आहे. शिक्षणातून स्वावलंबी होण्याचा मार्ग म्हणून याकडे पहिले जाते. मात्र आतापर्यंत आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट पदवीसाठी प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे आयटीआय झाल्यानंतर पुढील शिक्षण घ्यायचे असेल तर त्या विद्यार्थ्यांना पुन्हा 11 विच्या वर्गात प्रवेश घ्यावा लागत होता. आता मात्र राज्य सरकारने या धोरणात मोठा बदल केला आहे. आयटीआयमधून उत्तीर्ण होणारांना 12 विचा समकक्ष दर्जा दिला जाणार आहे. त्यासाठी आयटीआयला महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडे नोंदणी करून नोंदणीक्रमांक घ्यावा लागणार आहे. अशा आयटीआयमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी केवळ 2 भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केली की त्यांना बारावीच्या विज्ञान शाखेतून उत्तीर्ण समजले जाणार असून त्यानंतर ते 12विच्या आधारे असलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. 

 

विद्यार्थ्यांना मोठा फायदा
आतापर्यंत आयटीआय झाल्यानंतर विद्यार्थी अकरावीसाठी प्रवेश घ्यायचे. आता मात्र आयटीआय झाल्याबरोबर लगेच केवळ 2 विषयांची परीक्षा देऊन विद्यार्थ्यांना बारावीची समकक्षता मिळविता येणार आहे. यात विद्यार्थ्यांचे दोन शैक्षणिक वर्ष वाचणार आहेत. त्यासाठी आमच्या विभागातील सर्व आयटीआयनी मंडळाकडे नोंदणी केली असून नोंदणीक्रमांक मिळविले आहेत. यावर्षापासूनच विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देता येणार आहे.
- डी.एम.राठोड 
(प्रभारी निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण 
कार्यालय, औरंगाबाद)

 

 अशी असेल प्रक्रिया
आयटीआयमध्ये दहावी उत्तीर्ण नंतर प्रवेश घेतानाच आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांचे 12 वी समकक्षतेसाठी संमतीपत्र घेतले जाईल आणि त्याची नोंद मंडळाच्या संकेत स्थळावर घेतली जाईल. सदर विद्यार्थी आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षण मंडळाकडे त्याची माहिती दिली जाईल. त्यानंतर सदर विद्यार्थ्यांची 2 भाषा विषयांची परीक्षा घेतली जाईल आणि त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना 12 वी उत्तीर्णची प्रमाणपत्र मिळेल.

 

Advertisement

Advertisement