महायुतीतील मित्रपक्ष तर सोडा इथे एकाच पक्षातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्यातील संबंध किती 'मधुर ' आहेत याची अनेक उद्धरणे राज्यात महायुतीच्या संदर्भाने पाहायला अनुभवायला मिळालेली आहेत . कधी निधीच्या कारणावरून तर कधी आणखी कोणत्या विषयावरून महायुतीमधील लोकच एकमेकांचे वाभाडे काढतात , एक उपमुख्यमंत्री आपले राग आला की शेती करायला निघून जातात तर दुसरे उपमुख्यमंत्री थेट नॉट रिचेबल होतात, हे आजच्या महाराष्ट्राचे वास्तव आहे. अशावेळी मोदींना अपेक्षित असलेला एकोपा वाढणार तरी कसा ?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. नरेंद्र मोदी हे संघ परिवारातून आलेले असल्याने त्यांना बौद्धिक ऐकण्याची आणि घेण्याची देखील सवय अगदी अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील महायुतीच्या आमदारांचे बौद्धिक या दौऱ्याच्या निमित्ताने घेतले. खरेतर नरेंद्र मोदी हे भाजपचे असले तरी आपले स्वतंत्र अस्तित्व आहे म्हणणाऱ्या सर्वच मित्रपक्षांच्या देखील बहुतेक सर्व आमदारांनी मोदींच्या या बौद्धिकाला हजेरी लावली होतीच. महायुतीमधील एकोपा किमान अशा प्रसंगी तरी दिसला पाहिजे अशी काहीशी भावना यात असावी. नरेंद्र मोदी यांनी राज्यातील महायुतीच्या आमदारांना अर्थातच 'सांगेन युक्तीच्या गोष्टी चार ' म्हणत काही कानमंत्र दिले आहेत. अर्थात आजची महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय परिस्थिती आणि लोकप्रतिनिधींची एकूणच भूमिका लक्षात घेता किंवा पाहू जाता नरेंद्र मोदींचे सल्ले यातील किती आमदारांच्या पचनी पडणार हा मोठा प्रश्न आहे.
महायुतीच्या आमदारांना नरेंद्र मोदींनी जे सॅले दिले त्यातला एक सल्ला सरकारी अधिकाऱ्यांसोबत नम्रपणे बोला, बदली आणि दलाली कामापासून स्वत:ला दूर ठेवा असा देखील होता. आजकाल सरकारी कार्यालयातून नम्रता हद्दपारच झाली असावी अशीच परिस्थिती आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता सरकारी अधिकारी, कर्मचारी सामान्यांना आणि लोकप्रतिनिधी सरकारी अधिकाऱ्यांना कोणत्या भाषेत बोलतात याचे अनेक व्हिडीओ, ऑडिओ आज राजरोसपणे सोशल मीडियावर व्हायरल होतच असतात. सरकारी अधिकाराची, कर्मचाऱ्यांना वापरली जाणारी भाषा बहुतांशवेळा सार्वजनिक कामासाठी कमी आणि कोणाची तरी बदली, बढती , कोणत्या तरी कार्यकर्त्याची चुकीची बिले काढणे , कोणत्यातरी कार्यकर्त्याचे चुकीच्या मार्गाने पुनर्वसन यासाठीच अधिक असते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. याला काही अपवाद आहेतही, नाही असे नाही, पण ते अपवादच. त्यांचा नियम झालेला नाही. मग आता अचानक सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी नम्रपणे बोलण्याचा नियम लोकप्रतिनिधींनी अमलात आणायचा तरी कसा ?
मोदींचा दुसरा सल्ला होता, तो परस्परात एकोपा वाढविण्याचा. हायुतीतील एकोपा वाढवण्यासाठी आपले जे आमदार, पदाधिकारी आहेत त्यांच्या एकमेकांच्या कार्यालयांना भेटी द्या. गावोगावी डब्बा पार्टी आयोजित करा. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपलं सगळ्याकडे लक्ष असले पाहिजे.मतदारसंघात ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही त्यांच्यासाठी काम करून विरोधकांनाही आपलेसे करा असे खूप काही मोदी बोलले. एक पंतप्रधान म्हणून त्यांचे असे बोलणे नक्कीच स्वागतार्ह आहे. आजच्या राजकारणाची, समाजकारणाची ती आवश्यकता देखील आहे , पण हे साधायचे कसे ? तीन दिवसांपूर्वीच भाजपच्याच एका बैठकीत पदाधिकाऱ्यांमधील वाद सोडविण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागल्याचा व्हिडीओ अद्याप ताजा आहेच. कोणत्याही प्रकरणावरून महायुतीमधील आमदार एकमेकांना कसे अडचणीत आणतात, अगदी एकच पक्षाच्या लोकप्रतिनिधींचे एकमेकांबद्दलचे मत काय असते याचे जाहीर प्रदर्शन केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेले आहेच. त्यामुळे जिथे एका पक्षात एकोपा साधता येत नाही, तिथे एकमेकांच्या शेजारी बसल्यानंतर उलट्या होतात अशी भावना ठेवून मंत्रिमंडळात एकमेकांच्या शेजारी असलेल्या लोकांमध्ये एकोपा आणि स्नेह वाढायचा कसा ? मोदींची अपेक्षा चांगली आहे, विचारही चांगला आहे, पण तो महाराष्ट्रातील महायुतीच्या पचनी पडेल का ?