Advertisement

संपादकीय अग्रलेख- चुकीच्या लोकांना प्रोत्साहन देते कोण ?

प्रजापत्र | Monday, 13/01/2025
बातमी शेअर करा

प्रत्येकालाच राजकीय नेत्यांसोबत फोटो काढायची इच्छा होते आणि फोटो काढू दिले नाही तर लोक नाराज होतात , त्यामुळे चुकीच्या लोकांना आमच्यापासून दूर ठेवा असे अजित पवारांनी पोलिसांना सांगितले आहे. मात्र आज राजकारणात चुकीच्या मार्गाने मोठे झालेल्या अनेकांना प्रतिष्ठा मिळालेली आहे आणि त्यांना ही प्रतिष्ठा कमी अधिक फरकाने सर्वच राजकीय नेत्यांनी मिळवून दिलेली आहे , मग पोलिसांनी पुढाऱ्यांच्या जवळ जाण्यापासून नेमके रोखायचे कोणाला ?

मस्साजोचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या राज्यात रोज नवनव्या चर्चा जोरात सुरु आहेत. अनेकदा देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठीचा आणि आरोपींना शिक्षेचा मूळ मुद्दा बाजूला जातो की काय असे वाटावे अशा पद्धतीने आता या विषयावरील चर्चा, क्रिया, प्रतिक्रिया, आरोप, प्रत्यारोप वेगवेगळ्या वळणांनी जात आहेत. या संपूर्ण प्रकरणात खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचे अनेक  फोटो देखील चर्चेत आहेत . वाल्मिक कराड प्रकरणावरून थेट धनंजय मुंडे यांच्यावर शरसंधान केले जात असतानाच  वाल्मिक कराडचे फोटो अनेक नेत्यांसोबत आहेत. त्यातूनच आता उपमुख्यमंत्री  अजित पवारांनी अलीकडे गर्दी वाढत आहे, सगळ्यांना आमच्या सोबत फोटो काढायचा असतो, पण फोटो नाय काढून दिला तरी नाराज होतात, आणि गडी बदलला असं म्हणतात,आणि अशातच एखादा नवीन गडी येतो फोटो काढून जातो आणि वाटच लागते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढताय याची आम्हाला कल्पना कार्यकर्त्यांनी द्यावी, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यासोबतच अजित पवारांनी पोलिसांनाही कार्यक्रमात असे कोणी फोटो काढत असतील, त्यावर लक्ष द्या. दोन नंबरवाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना आमच्यापासून लांब ठेवा, असे सांगितले आहे. अजित पवारांची ही सूचना सावधगिरी म्हणून ठीक आहे , पण आज पांढऱ्या कपड्यांमध्ये वावरणारा व्यक्ती उद्या काय करेल याची खात्री पोलीस तरी कशी देणार ? मुळात दोन नंबरवाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांसाठी राजकारणाची दारे खुली केली कोणी ? राजकारण्यांनीच ना, याला काही अपवाद असतीलही , पण बहुतांश पुढाऱ्यानीच अशा दोन नंबरवाल्यांना मोठे केले आहे हे वास्तव आहे.
मस्साजोगचे एकच प्रकरण नाही, येथे तर एक आरोपी अजित पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी होता , मात्र हे काही राज्यातले पहिलेवहिले उदाहरण नाही. आज बहुतांश राजकारण्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यातील अनेकांचे पुनर्वसन चुकीच्या मार्गानेच केले जाते हे ढळढळीत वास्तव आहे., नेत्यांच्या वाढदिवसाला जे मोठमोठे बॅनर लागतात , त्यावरचे चेहरे काही अपवाद वगळता , फार सामाजिक कार्याची तळमळ असणारे नसतात, तर त्या चेहऱ्यांची सारी पार्श्वभूमी त्या भागातील जनतेला माहित असते, त्या नेत्यालाही माहित असते , पण अशा लोकांना प्रतिष्ठा मिळवून दिली जाते. असेही फार सरळमार्गाने चालणारे लोक स्वतःची पदरमोड करून कशाला कोणासाठी बॅनरबाजी करतील ? पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील आरोपींना सोडविण्यासाठी फोन करणारे कोण असतात ? अशा लोकांना का सोडवायचे असते, तर आपली जय म्हणणारे कार्यकर्ते हवेत म्हणूनच ना ? जो नेता 'मी चुकिच्या कामासाठी पोलीस ठाण्यात फोन करणार नाही ' अशी भूमिका घेतो, त्या नेत्याच्या अडचणी किती वाढतात हे बीड जिल्ह्यात देखील अनेकांनी अनुभवले आहेच ना ?
आजच नाही, मागच्या दोन तीन दशकातली माहिती घेतली तरी वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे पदाधिकारी असतील किंवा अगदी शासकीय समित्यांवरील सदस्य, पदाधिकारी , त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा कधी गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता कोणत्या तरी राजकीय पक्षाला किंवा नेत्याला वाटली का ? मग गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना राजकारण , समाजकारणात पदे मिळणार असतील, प्रतिष्ठा मिळणार असेल तर त्यांचा वावर वरिष्ठ राजकीय वर्तुळात वाढणारच . आज ज्या वाल्मिक कराडांवर टीका होत आहेत, त्याच वाल्मिक कराडांच्या नियोजनाचे तोंडभरून कौतुक करणारे लोक वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते होते , याला काही फार वर्ष लोटलीत असेही नाही , त्यामुळे दोन नंबरवाले आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवाले यांना नेत्यांच्या जवळ जाण्यापासून रोखायचे कसे ? आणि पोलिसांना ते कसे शक्य होणार आहे ? यासाठी सर्वच राजकीय पक्ष 'आम्ही गुन्हेगारीला, गुंडगिरीला पाठबळ देणार नाही, आमच्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याचे, त्याला उभे करण्याचे 'सभ्य ' मार्ग शोधू , गुंडांना राजकीय प्रतिष्ठा देणाराच नाहीत ' अशी काही भूमिका प्रामाणिकपणे घेणार आहेत का ? आणि तसे होणार नसेल तर केवळ एखादे प्रकरण घडल्यानंतर काही तरी टीकाटिपण्णी , आरोपप्रत्यारोप आणि कोणाला तरी लांब ठेवण्याच्या तात्पुरत्या सूचना देऊन काय साधणार आहे ?

Advertisement

Advertisement