Advertisement

छत्तीसगडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला

प्रजापत्र | Monday, 06/01/2025
बातमी शेअर करा

 छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी कुत्रू रोडवर आयईडी पेरला होता. सुरक्षा दलाचे वाहन त्याच्या प्रभावाखाली आले. IED स्फोटात ९ जवान शहीद झाले आहेत. ६ हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत. सैनिकांचे पथक ऑपरेशन करून परतत होते.

 

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांनी मोठी घटना घडवली. नक्षलग्रस्त कुत्रु ते बेद्रे मार्गावर करकेलीजवळ नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेल्या पिकअप वाहनाचा स्फोट केला आहे. एडीजी नक्षल ऑपरेशन्स विवेकानंद सिन्हा यांनी या हल्ल्यात आतापर्यंत ९ जवान शहीद झाल्याची पुष्टी केली आहे. शहीदांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या घटनेत काही जवान जखमीही झाले आहेत. बस्तर आयजीच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात एकूण ९ जवान शहीद झाले आहेत. ज्यात  ८ डीआरजी सैनिक आणि एक नागरिक (पीकअप वाहनाचा चालक) यांचा समावेश आहे. नक्षलवाद्यांनी याठिकाणी अगोदरच भूसुरुंग टाकली होती. या भूसुरुंगाच्या प्रभावाखाली सैनिकांचे वाहन येताच नक्षलवाद्यांनी तत्काळ त्याचा स्फोट केला.

पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलविरोधी मोहिमेवरून छावणीकडे परतत असलेल्या वाहनात १५ हून अधिक सैनिक होते. सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवाद्यांनी अगोदरच भूसुरुंग घातली होती. त्यामुळे ९ जवान शहीद झाले होते. सध्या घटनास्थळी एक रुग्णवाहिका आणि जवानांचे पथक पाठवण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement