मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्भात राजधानी दिल्ली आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी अनेक बैठका झाल्याचं दिसून आलं. काही बैठका तिन्ही पक्षांच्या नेतृत्वामध्ये झाल्या तर काही पक्षांतर्गत बैठकाही झाल्याचं पाहायला मिळालं. मंत्रीमंडळ विस्तार कधी आणि कसा होणार? याबाबत फक्त दावे होत असले, तरी नेमका हा विस्तार कधी होणार याची निश्चित माहिती समोर येत नव्हती. आता मात्र खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याबाबत मोठं विधान केलं आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज अजित पवार यांनी सहकुटुंब त्यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी जवळपास अर्धा तास अजित पवार, त्यांच्या पत्नी व खासदार सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आदी नेतेमंडळीही शरद पवारांच्या निवासस्थानी उपस्थित होती. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडलं? याबाबत राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असतानाच भेट झाल्यानंतर बाहेर आल्यावर अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना इतर मंत्र्यांच्या शपथविधीबाबत मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
शरद पवारांची भेट घेऊन बाहेर आलेल्या अजित पवारांना माध्यमांनी राज्य मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? याबाबत विचारणा केली. त्यावेळी अजित पवारांनी दोन दिवसांनी शपथविधी होणार असल्याचा उल्लेख केला. “राज्यात सध्या मुख्यमंत्री व आम्ही दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी झाला आहे. त्यामुळे सगळ्यांनाच इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? याबाबतची उत्सुकता आहे. बहुतेक १४ तारखेला हा शपथविधी होईल”, असं अजित पवार म्हणाले.